वोटर आयडी आणि आधार होणार लिंक, निवडणूक आयोगाला सरकार देणार अधिकार

10752

मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक होणार आहे. केंद्र सरकार निवडणूक आयोगाला हे अधिकार देणार असून त्यासाठी कायदेशीर तरतूद करण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. तसेच पेड न्यूज आणि प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्यास गुन्हा ठरवला जावा अशी शिफारसही निवडणूक आयोगाने केली आहे. निवडणूक प्रक्रियेत अनेक बदल करण्यासाठी कायदा मंत्रालयाने अनेक शिफारसींवर विचार केला आहे.

नुकतीच निवडणूक आयोग आणि कायदा मंत्रालयाची बैठक पार पाडली. त्यात मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा, निवडणूक आयुक्त अशोक लवासा, सुनील चंद्रा तर  कायदा मंत्रालयाचे सचिव नारायण राजू हे उपस्थित होते. मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. लोकप्रतिनिधी कायद्यात बदल करण्यात यावा असा प्रस्ताव निवडणूक आयोगाने केंद्राला दिला होता. त्यानुसार मतदार ओळखपत्र बनवणे आणि मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांकडून आधार क्रमांक घेणे या गोष्टींची तरतूद आहे. केंद्र सरकारने या तरतुदींना हिरवा झेंडा दाखवला असून मतदारांची माहिती सुरक्षित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. डेटा लीक होऊ नये यासाठी केंद्र सरकारने कडक पावले उचलली आहेत.

मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी सध्या 1 जानेवारी ही तारीख दिली जाते. परंतु नवमतदारांना आपले नाव नोंदवण्यासाठी अनेक पर्याय मिळावे यासाठीही निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे.

आपली प्रतिक्रिया द्या