मतदान झाले… आता निकालाची प्रतीक्षा, पदवीधरांमध्ये निरुत्साह; शिक्षकांमध्ये उदंड उत्साह

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पाच जागांसाठी सरासरी 75 टक्के मतदान झाले. कोकण, संभाजीनगर आणि नागपूर शिक्षक मतदारसंघात मतदारांचा उदंड उत्साह दिसून आला. मात्र, नाशिक व अमरावती पदवीधर मतदारसंघात बहुसंख्य मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. शिक्षक मतदारसंघात सरासरी 90 तर पदवीधरसाठी 50 टक्के मतदान झाले. महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे सत्ताधारी भाजपची धाकधूक सध्या तरी वाढली असून सर्वांचे लक्ष आता 2 फेब्रुवारीला होणाऱया मतमोजणीकडे लागले आहे.

निवडणूक झालेल्या पाचही मतदारसंघात सध्या महाविकास आघाडीचे तीन तर भाजपचे दोन आमदार आहेत. या जागा कायम राखण्याचे आव्हान सत्ताधारी आणि विरोधकांकडे असले तरी महाविकास आघाडीतील एकजूटीमुळे ही निवडणूक भाजपला जड जाण्याची चिन्हे आहेत. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत जुनी पेंशन योजना लागू करण्याचा मुद्दा सत्ताधारी भाजपसाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. पदवीधर मतदारसंघात राज्यातील सुशिक्षित मतदारांचा काwल उमेदवारांसाठी महत्त्वाचा असून कमी मतदानामुळे कुणाला लॉटरी लागणार याची उत्सुकता आहे.

नाशिक पदवीधरमधून अपक्ष शुभांगी पाटील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पाठींब्याने निवडणूक रिंगणात आहेत. तर संभाजीनगर शिक्षकमधून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विक्रम काळे, कोकण शिक्षकमधून महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणाऱया शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील. तर अमरावती पदवीधरमधून धीरज लिंगाडे, नागपूर शिक्षक मतदारसंघातून कॉँग्रेसच्या पाठिंब्याने सुधाकर अडबाले निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी महाविकास आघाडीने आपली ताकदपणाला लावल्याने पाचही मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत होईल.

नागपूरमध्ये 86.23 टक्के मतदान

विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सहा जिह्यांमध्ये शांततेत मतदान पार पडले. सर्व जिल्हय़ांमध्ये जवळपास 86.23 टक्के मतदान झाल्याचे तसेच आकडेवारी अंतिम होण्याचे बाकी असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली आहे. दरम्यान, सर्व जिह्यांमधून नागपूर येथील स्ट्राँगरुमकडे मतदान पेटय़ा रवाना झाल्या आहेत.

मराठवाडय़ात 86 टक्के मतदान!

संभाजीनगर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मराठवाडय़ात 86 टक्के बंपर मतदान झाले. शिक्षकांचा विधिमंडळातील नेता ठरविणाऱया या निवडणुकीत संभाजीनगरासह मराठवाडय़ातील अनेक ठिकाणी शिक्षक मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. संभाजीनगरातील एसबीओए स्कूल, होलीक्रॉस स्कूल, अप्पर तहसील कार्यालय, आटीआय यासह अनेक मतदान पेंद्रांवर दुपारच्या सुमारास शिक्षक मतदारांच्या रांगा दिसून आल्या. हिंगोली जिह्यातही असेच चित्र होते.

कोकण शिक्षक मतदारसंघात 91 टक्के मतदान

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आज ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांतील 98 मतदान केंद्रांवर सुमारे 91.03 टक्के मतदान झाले. मतदानाला सकाळपासूनच मतदारांचा जोरदार प्रतिसाद मिळाल्यामुळे मतदान पेंद्रांबाहेर मोठमोठय़ा रांगा लागल्या होत्या. पहिल्या दोन तासांत सहा हजार तर त्यानंतरच्या दोन तासांत दहा हजार मतदारांनी आपला हक्क बजावला. सायंकाळी चार वाजेपर्यंत 35 हजार 75 मतदारांनी मतदान केले.

नाशिक ‘पदवीधर’साठी 50 टक्के मतदान

विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी सोमवारी पाच जिह्यांमधील 338 पेंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. अंदाजे 50 टक्के मतदान झाले असून, 16 उमेदवारांचे भवितव्य मतदानपेटीत बंद झाले आहे.

सत्यजित कमळाबाईपासून सुरक्षित अंतरावर

नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना जाळय़ात ओढण्याचा प्रयत्न भाजपने सुरुवातीपासून केला, पण ते त्यांच्या हाताला लागले नाहीत. शेवटी मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपने त्यांना अघोषित पाठिंबा जाहीर करून गळाला लावण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्यजित यांनी मी कॉँग्रेसचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. माझ्याकडे पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने मी अपक्ष झालो, असे सांगत सत्यजित तांबे यांनी कमळाबाईपासून सुरक्षित अंतरावर राहणे पसंत केले आहे.