आमची मालमत्ता विका, ठेवीदारांचे पैसे द्या! वाधवानचे रिझर्व्ह बँकेला पत्र

2046

पीएमसी बँक घोटाळय़ातील प्रमुख आरोपी ‘एचडीआयएल’चे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवान यांनी केंद्रीय अर्थ खाते, आरबीआय आणि ईडीला ‘आमची मालमत्ता विका आणि ठेवीदारांचे पैसे द्या,’ असे पत्र लिहिले आहे. त्यांनी या पत्रात त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप नाकारले आहेत.

पीएमसी बँकेत 4 हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज घोटाळा केल्याप्रकरणी वाधवान पिता-पुत्रांना अटक करण्यात आली आहे. त्यांची पोलीस कोठडी काल संपल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्या कोटय़वधी किमतीच्या 18 मालमत्ता जप्त केल्या आहेत. पत्रात या सर्व मालमत्तांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर आधीही तीन वेळा अशा प्रकारचे पत्र अर्थ खाते, आरबीआय आणि ईडीला लिहिल्याचा उल्लेखही त्यात आहे. पत्राची दखल घेत मालमत्ता तात्काळ विका आणि आम्ही घेतलेल्या कर्जातून ती वजा करा, अशी विनंती वाधवान पिता-पुत्रांनी केली आहे.

वाधवानची मालमत्ता
बंगला – अलिबागला 22 खोल्यांचा अडीच एकरवरील बंगला
विमान – फाल्कन 2000 जेट
बोटी – फेरटी यॉट, स्पीड बोट
गाडय़ा – रोल्स रॉयस फँटम, बेंटली कॉन्टिनेंटल, बीएमडब्ल्यू 730 एलडी, ऍम्बेसेडर, ऑडी, दोन इलेक्ट्रिक गाडय़ा, तीन क्वॉड दुचाकी

सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
पीएमसी खातेदारांच्या ठेवींना 100 टक्के संरक्षण मिळावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश जारी करावेत, अशी याचिका पीएमसीच्या खातेदारांनी दाखल केली आहे. त्यावर उद्या, 18 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

अरोराला 22 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
पीएमसी बँक घोटाळाप्रकरणात काल अटक करण्यात आलेला माजी संचालक सुरजीतसिंह अरोरा याला प्रथम महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांनी आज 22 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्याचबरोबर बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस याच्या पोलीस कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

हायकोर्टात याचिका, 22 ऑक्टोबरला सुनावणी
आरबीआयने पंजाब-महाराष्ट्र बँकेवर निर्बंध घातले असून या निर्बंधांमुळे खातेदार अडचणीत आले आहेत. त्यातच या तणावग्रस्त प्रसंगामुळे दोघा खातेदारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. म्हणूनच खातेदारांच्या हितासाठी पंजाब-महाराष्ट्र बँकेतून पैसे काढण्यावरील बंधने आरबीआयद्वारे हटविण्यात यावीत अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 22 ऑक्टोबर रोजी मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. पंजाब-महाराष्ट्र बँकेतील खातेदाराच्या अडचणी वाढल्याने कन्झ्युमर ऍक्शन नेटवर्क (कॅन) च्यावतीने ऍड. एकनाथ ढोलप यांनी याचिका दाखल केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या