>>सचिन जगताप
भूमिपुत्र आणि मच्छीमारांचा कडाडून विरोध असतानाही विनाशकारी वाढवण बंदर लादणाऱया केंद्र सरकारविरोधात आज संतापाचा भडका उडाला. वाढवण गावात शेकडो आंदोलकांनी केंद्र सरकारचा पुतळा पेटवला.
नही चलेगी, नही चलेगी… तानाशाही नही चलेगी, हमारे गाव में हमारा राज.., एकच जिद्द वाढवण बंदर रद्द.., हमसे जो टकरायेगा मिट्टी मे मिल जाएगा.. अशा गगनभेदी घोषणा देत वाढवण बंदराची एक वीटही रचू देणार नाही, असा इशारा भूमिपुत्र आणि मच्छीमारांनी दिला. आज ठिणगी पेटली उद्या भडका उडेल असे ठणकावतानाच रेल रोको, रास्ता रोको, जलसमाधी आंदोलन करून सरकारला सळो की पळो करून सोडू, असा वज्रनिर्धार पालघरवासीयांनी आज झालेल्या बैठकीत केला.
वाढवणवासीयांना जनसुनावणींच्या फेऱयात गुंतवून पुन्हा केंद्रात सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एनडीए सरकारने वाढवण बंदर प्रकल्प पालघरवासीयांवर लादला. या बंदरामुळे भूमिपुत्र देशोधडीला लागणार आहेत. मच्छीमारांचा रोजगार नष्ट होऊन ते उद्ध्वस्त होणार आहेत. या आधी बंदराविरोधात वाढवणवासीयांनी शेकडो आंदोलने केली. मात्र आज वाढवण येथे भवानीमाता मंदिरात झालेल्या बैठकीत बंदरविरोधात आता आर या पारचा नारा देण्यात आला. त्यामुळे आता वाढवण बंदरविरोधी आंदोलन चिघळणार आहे.
यावेळी स्वप्नील तरे, भूषण भोईर, हेमंत तामोरे, शशी सोनावणे, भारत वायदा, नरेंद्र पाटील, नरेंद्र सुतारी, राजश्री भानाजी, विजय वझे, प्रताप आव्रे, किरण दळवी, हर्षद पाटील, शिवसेना शाखाप्रमुख उत्तेजन पाटील, शरद दळवी, ओसरवाडी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाटील यांच्यासह वाढवण, डहाणू खाडी, चिंचणी, वरोर, दिघरेपाडा येथील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
हे सरकारच असंविधानिक
नरेंद्र मोदी यांनी सत्तेचे आकडे जमवले आहेत. अजून या सरकारची बहुमत चाचणीही झाली नाही. हे सरकारच अजून असंविधानिक आहे. ते किती काळ टिकेल हेही सांगता येत नाही. मग पहिल्याच कॅबिनेटीमध्ये वाढवण बंदराला मंजुरी देऊन त्यांना कोणाचे चांगभले करायचे आहे, असा सवाल मच्छीमारांनी केला. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या जखमेवर मीठ चोळले आहे. यापुढे अवघ्या कोकणपट्टीचा भूमिपुत्र एकत्र येऊन तुमच्या या विनाशकारी प्रकल्पांविरोधात लढा देईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
आमची राख आणि गुजरातला रांगोळी हे चालणार नाही
गैरकारभार आणि गैरप्रकार करून तुम्ही पालघरचा खासदार निवडून आणलात म्हणजे तुम्ही भूमिपुत्रांना विकत घेतले असे होत नाही. यापुढे वाढवणविरोधात मोठे आंदोलन उभे राहील, असेही भूमिपुत्र आणि मच्छीमारांनी यावेळी ठणकावून सांगितले. वाढवण बंदर उभारण्याचा केंद्र सरकारचा हट्ट कशासाठी. त्यापेक्षा जैवविविधता टिकवण्याकरिता तेथे मरीन पार्क उभारा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. आमची राख करायची आणि रांगोळ्या गुजरातला काढायच्या हा केंद्र सरकारचा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असेही वाढवणच्या ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले.