वैनगंगा नदी पात्रातच मृतदेहावर दफनविधी, नदीचे पात्र ओसरले अन सांगाडे दिसू लागले

दफनविधीसाठी आरक्षित केलेल्या जागेमध्ये मृतदेहाचे दफन न करता चक्क नदीपात्रामधील रेतीत मृतदेह दफन करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नदी पात्र ओसरल्याने मृतदेहाचे सांगाडे दिसू लागले आहेत. हा प्रकार जिल्हातील सावली तालुक्यात उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या नदी पात्रातून अनेक गावांना पाणी पुरवठा केला जातो.

चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यांना जोडणारी वैनगंगा नदी आहे. नदीच्या पूर्व दिशेच्या काठावर गडचिरोली जिल्ह्याचा गडचिरोली तालुका, तर नदीच्या पश्चिम दिशेच्या काठावर चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुका आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळे वैनगंगा नदीचे पात्र आटत आले आहे.

नदीच्या पूर्व दिशेच्या बाजूने गडचिरोली तालुका आहे.त्या भागातील नदीचे काठ कोरडे पडले आहे. दुसऱ्या बाजूने सावली तालुका आहे. या भागातील नदीच्या काठावर बारमाही पाण्याची धार वाहत असते. विविध गावांना जलजीवन, जलमिशन, सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून इथून पाणीपुरवठा केला जातो. याच भागात गडचिरोली तालुक्याच्या टोकावरील गावातील नागरिक हे मृतदेहाचे अंत्यसंस्कार विधी करताना नदीच्या काठावर आरक्षित केलेल्या जागेवर न करता चक्क नदीपात्रातील रेतीत अडीच फुटाचा खड्ड्या करून त्यात मृतदेहाचे दफन करीत आहेत.काही मृतदेहाचे सांगाडे आता दिसू लागले आहेत.

दफन, दहन नदी पात्रातच..

रीतीरिवाजाप्रमाणे प्रत्येक समाजातील अंत्यसंस्काराची विधी वेगवेगळी असते. काही समाजात पार्थिवाचे दहन करतात, तर काही ठिकाणी दफन करतात. विधी पार पाडण्याकरिता शासनाच्या वतीने स्मशानभूमीची जागा आरक्षित करून दिली आहे. या आरक्षित जागेवर काही समाजाकडून परंपरेनुसार मृतदेहाचे दहन अथवा दफन केले जाते. वैनगंगा नदीपात्रातील रेतीमध्ये मृतदेह दफन तर काही ठिकाणी दहन केले जात आहे. मात्र यामुळे नदी पात्र प्रदूषित झाले आहे.

पाणी होत आहे दूषित

दफन केलेले मृतदेह पाण्याचा प्रवाहाने नदीपात्रात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या साऱ्या प्रकारणे नदी पात्र दूषित होत आहे. तर दुसरीकडे येथील पाण्याने आरोग्य धोक्यात आले आहे.