टंचाईग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे शुल्क माफ

10

सामना प्रतिनिधी । पुणे

राज्य शासनाने टंचाईग्रस्त भागातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे शुल्क माफ केले असून, हजारो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. राज्यातील गोंदिया, तिरोडा व गोरेगाव येथील १४ हजार ६७९ गावांमधील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ केले जाणार आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा राज्यात सुरू आहेत. मात्र टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या शुल्काचा भार होऊ नये म्हणून या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअंतर्गत राज्यातील १४ हजार ६७९ गावांमधील विद्यार्थ्यांना शुल्काची प्रतिपूर्ती केली जाणार आहे. यामुळे किती विद्यार्थ्यांना लाभ होईल, याचा आकडा आताच सांगणे कठीण असल्याचे राज्य मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितले.

राज्य शासनाने शैक्षणिक वर्ष २०१५-१६मधील हजारो विद्यार्थ्यांचे शुल्क माफ केले होते. त्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीसाठी राज्य मंडळाला ३१ कोटी ४८ लाख ६६ हजार ५१० रुपयांचा निधी दिला होता. मात्र, विद्यार्थ्यांना चेक देऊनसुद्धा त्यांनी ते वटविलेच नसल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले होते. त्यातील जवळपास ५१ लाख नऊ हजार शिलकीच्या रकमेतून यंदाच्या विद्यार्थ्यांची शुल्कमाफी करावी व जास्तीची रक्कम लागल्यास यंदाच्या तरतुदीचा वापर करावा, असे सांगण्यात आले आहे.

बोर्डाकडे ४ कोटी रक्कम शिल्लक
राज्य शासनाने २०१५-१६ साली दिलेल्या शुल्कमाफीअंतर्गत विभागीय मंडळांना वितरित रक्कम आठ कोटी ३४ लाख २७ हजार १७५ होती. त्यापैकी ५ नोव्हेंबर २०१७पर्यंत विद्यार्थ्यांना मंडळांनी धनादेशाद्वारे आठ कोटी सहा लाख पाच हजार ६२८ रुपये दिले. त्यांतील विद्यार्थ्यांनी केवळ तीन कोटी ८४ लाख ३५ हजार ४९१ रुपयांचे चेक वटविले; तर बोर्डाकडे चार कोटी ४९ लाख ९१ हजार ६८४ रुपयांची रक्कम शिल्लक होती.

आपली प्रतिक्रिया द्या