झोपडपट्टीवासीयांसाठी खासगी संस्थांकडून ‘वॉक इन व्हॅक्सिनेशन’! लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबईत झोपडपट्टी भागात कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पालिकेने खासगी संस्थांकडून ‘वॉक इन’ पद्धतीने लसीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक बडय़ा खासगी संस्था, सामाजिक संस्थांशी चर्चा सुरू झाली असून उत्तम आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

अवघ्या जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोनावर देशासह मुंबईतही 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला. पालिकेनेही लसीकरण वेगाने यंत्रणा उभी करून लसीकरण सुरू ठेवले आहे. दररोज दोन लाख डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवून पालिकेही यंत्रणा उभारली आहे. विशेष म्हणजे दिवसाला दीड लाखावर डोस देऊन पालिकेने आपली क्षमताही सिद्ध केली आहे. मात्र लसींच्या तुटवडय़ामुळे पालिकेच्या लसीकरण मोहिमेला वारंवार बेक लागत आहे. याचा परिणाम लसीकरण मोहिमेवर होत असून पालिकेच्या यंत्रणेचाही अपव्यय होत आहे. विशेष म्हणजे झोपडपट्टी भागात याचा मोठा परिणाम दिसत आहे. त्यामुळेच खासगी संस्थांच्या माध्यमातून झोपडपट्टी भागात लसीकरण मोहीम राबवण्यावर भर देणार असल्याचे काकाणी यांनी स्पष्ट केले.

असा राबवणार उपक्रम

– पालिकेला सद्यस्थितीत 50 टक्के लसीकरण ऑनलाइन नोंदणीने आणि 50 ‘वॉक इन’ पद्धतीने करता येत आहे. त्यामुळे शिबीर लावून जादा डोसही देता येत नाहीत. मात्र खासगी संस्थांना ऑनलाइनचे बंधन राहणार नसल्याने दोन-तीन दिवसांच्या शिबिरात ‘वॉक इन’ पद्धतीने हजारो जणांचे लसीकरण करणे शक्य होणार आहे.
– शिवाय या उपक्रमात खासगी संस्था, सामाजिक संस्था खासगी रुग्णालयांशी स्वतः करार करून शिबीर आयोजित करणार असल्यामुळे निधीच्या विनियोगाबाबतही त्यांची विश्वासार्हता वाढणार असल्याने या उपक्रमाला प्रतिसाद वाढणार असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

‘सीएसआर’ फंडातून राबवणार उपक्रम

पालिकेला पुरेसे डोस मिळत नसले तरी कोविन अॅपवरून लस निर्मिती-पुरवठादार पंपन्यांशी करार केलेल्या रुग्णालयांना त्यांच्या गरजेनुसार आवश्यक त्या प्रमाणात कोरोना लसींचे डोस उपलब्ध होत आहेत. खासगी रुग्णालयात डोससाठी पैसे द्यावे लागत असल्याने मोफत लस मिळणाऱया पालिकेच्या पेंद्रांवर गर्दीही होत आहे. परिणामी रुग्णालयांकडे अतिरिक्त डोस राहत आहेत. या डोसचा वापर खासगी संस्थांच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून केला जाणार असल्याने लसीकरणालाही गती मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या