6 डिसेंबरला पोलीस मिळणार नाहीत, वानखेडेवरील टी–20 सामना अडचणीत

542

हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज यांच्यात पहिला टी-20 सामना 6 डिसेंबरला वानखेडे स्टेडियमवर खेळविला जाणार आहे. मात्र त्या दिवशी तुम्हाला आवश्यक ते पोलीस बल मिळणार नाही असे आयुक्तांनी एमसीएला स्पष्टपणे सांगितल्याने हा सामना आता अडचणीत आला आहे.

6 डिसेंबरला बाबरी मशीद तोडण्यात आली होती. त्यासाठी मुंबईत कडेकोट बंदोबस्त असतोच. शिवाय  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनही 6 डिसेंबरला असतो. लाखो अनुयायी त्या दिवशी दादरच्या चैत्यभूमीवर येतात आणि बाबासाहेबांना अभिवादन करतात. त्यासाठीही मोठा बंदोबस्त ठेवण्यात येतो. वानखेडेवरील सामन्याला एक हजार पोलिसांची गरज आहे. मात्र एवढी सुरक्षा देणे शक्य नसल्याचे पोलीस आयुक्तांनी एमसीएला कळवले आहे. दरम्यान, उद्या यासंदर्भात बैठक होणार असल्याचे सांगण्यात  आले. सामन्यासाठी खासगी सुरक्षारक्षक तैनात होतील का ते बघा असे पोलिसांनी सांगितल्याचेही समजते.

अदलाबदली होऊ शकते 

आंतरराष्ट्रीय लढतीच्या आयोजनाचा मान आपल्याकडून जाऊ नये यासाठी एमसीएसमोर आणखी एक पर्याय असणार आहे. हिंदुस्थान-वेस्ट इंडीज यांच्यामध्ये 11 डिसेंबरला हैदराबाद येथे तिसरा सामना होणार आहे. हैदराबादला पहिल्या सामन्याचे आयोजन करण्यास सांगून एमसीए तिसऱ्या सामन्याचे आयोजन करू शकते. यासाठी बीसीसीआयची रीतसर परवानगी घ्यायला हवी.

आपली प्रतिक्रिया द्या