नोकरी सोडताय? जरा थांबा हे वाचा

168

सामना ऑनलाईन। मुंबई

तेच तेच नेहमीचं कामं, त्याच्या मोबदल्यात मिळणारा कमी पगार, खडूस बॉस, आणि ऑफिसमधलं राजकारण यांना कंटाळून जर तुम्ही नोकरी सोडायचा विचार करत असाल तर जरा थांबा. घाई करू नका. आधी हे वाचा. कारण नोकरी सोडणं जेवढे सोपं तेवढंच दुसरी नोकरी मिळवणं कठीण. यामुळे शांतपणे विचार करुनच हे पाऊल उचला. नाहीतर घाईत घेतलेल्या या निर्णयामुळे तुमच्यावर पुढे पश्चातापाची वेळ येवू शकतो.

another-job

दुसरी नोकरी मिळाल्याशिवाय आहे ती नोकरी सोडू नका
नोकरी म्हणजे एक ठराविक रक्कम घरात येण्याची खात्री. याच रकमेतून तर आपला महिन्याचा खर्च निघत असतो. महिन्याचा किराणा, मुलांच्या शाळेची फी, बँकेचे हफ्ते, लाईट बील, घरभाडे, पाणीपट्टी, सोसायटीचा हफ्ता, गाडीचा हफ्ता, सणवार, हॉटेलिंग, फिरायला जाणे, आजारपणाचा खर्च, भविष्याची तरतूद हे सगळ आपण पगारातून भागवत असतो. मग एवढा सगळा व्याप पगारावरच अवलंबून असताना उगाच कुठल्याशा कारणाने वैतागून नोकरी सोडण्याचा निर्णय घेणं कितपत योग्य आहे. याचा आधी विचार करा. आधी दुसऱ्या नोकरीचा शोध घ्या. तिकडचे अपॉइन्टमेंट लेटर मिळाल्या नंतरच पहिल्या कंपनीत महिन्याभर आधी नोटीस द्या. यादरम्यान प्रोव्हिडंट फंड, ग्रज्युईटी, सोसायटी, आणि इतर गोष्टींचा सोक्षमोक्ष लावा. मगच बाहेर पडा.

online-bank-cheking

नोकरीला रामराम करण्याआधी तुमचा बँक बँलन्स चेक करा.
नोकरी सोडण्याआधी बँक बँलन्स चेक करा. कारण जर तुम्हाला अजून दुसरा जॉब मिळाला नसेल आणि सध्याच्या कंपनीत आणखी काही दिवस काम करणे तुम्हाला शक्य नसेल तर जरा थांबा. ज्या कंपनीत इतके दिवस काढलेत तिथे अजून एक महिना काढा. म्हणजे तुमचे महिनाभराचे टेन्शन कमी होईल. त्यादरम्यान दुसऱ्या नोकरीचा शोध घ्या.

goosiping

ऑफिसमधील राजकारणाला कंटाळून नोकरी सोडणार असाल तर
हे लक्षात ठेवा सर्वच क्षेत्रात स्पर्धा असतात. पुढे जाणाऱ्याला मागे खेचणाऱ्या व्यक्ती सगळ्याच ऑफीसमध्ये असतात. फक्त वेगवेगळ्या नावाने त्या तुमच्या यशाआड येत असतात. पण जर तुमचा स्वत:वर विश्वास असेल तुम्ही मेहनती असाल तर तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. यामुळे अशा लोकांना शब्दाने किंवा स्वत:चे नुकसान करुन नाही तर कामातून चोख उत्तर द्या. यश तुमच्याकडे आपोआप वळेल.goodbye-to-friends

जुन्या कंपनीशी चांगले संबंध ठेवून निरोप घ्या

बऱ्याचवेळा बॉसशी सहकाऱ्यांशी पटत नसल्याने आपण नोकरी सोडतो. रोज रोजची ही कटकट कायमची संपवणे हा त्यामागचा आपला उद्देश असतो. पण अशा पद्धतीच्या कटुतेला फार थारा देऊ नये. कारण भविष्यात तुम्हाला कधी कोणाची कशी गरज लागेल हे सांगता येत नाही. यामुळे बॉस व सहकाऱ्यांबद्दल मनात कुठलाही राग ठेवू नका. कंपनीतील शेवटच्या दिवशी सगळ्यांना आनंदाने निरोप द्या. ज्यांच्याशी मतभेद झाले असतील त्यांनाही हसत निरोप द्या व भूतकाळातील वादांबदद्ल दिलगिरी व्यक्त करा. यातून तुमचा विचारी व दिलदार स्वभाव जगाला कळेल. कदाचित जे आधी तुमच्या विरोधात होते. तेच तुमचे चांगले मित्र बनतील.

आपली प्रतिक्रिया द्या