वरंध घाटात दरड कोसळली, महाड-भोर मार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्याने गणेश भक्तांचे हाल

वरंध घाटात दरड कोसळली आहे, यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महाड-भोरमार्गे पंढरपूर हा महामार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सव काळात वरंध घाट रस्ता बंद झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या गणेशभक्तांचे आणि अन्य प्रवाशांचे हाल झाले आहेत. प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेले आहे.

महाड तालुक्यातील वरंध घाटात उभारण्यात आलेले संरक्षण कठडे अतिवृष्टी दरम्यान कोसळून महामार्गावर आले असल्याने हा मार्ग बंद पडला आहे. वाहनचालकांना कोणत्याही प्रकारची इजा होऊन नये तसेच मोठी दुर्घटनाही होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने या रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली आहे. ही वाहतूक रोखून धरल्याने कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांचे हाल होत आहेत. हा मार्ग बंद होण्याची ही या पावसाळ्यातील दुसरी घटना आहे. दरवर्षी वरंध घाटात दुरुस्तीची कामे केली जातात, या कामाची लाखोंची बिले काढली जातात. मात्र केलेली कामे ही निकृष्ट दर्जाची असल्याने दरवर्षी पावसाळ्यात प्रवाशांना वाहतूक बंद केली जाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असते असा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकाशी व्हावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या