तीन प्रभाग समित्यांवर शिवसेनेचे शिलेदार

24

सामना ऑनलाईन, मुंबई

महानगरपालिकेच्या २०१७-१८ या वर्षासाठीच्या १७ प्रभाग समित्यांपैकी ८ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी पार पडली. त्यापैकी तीन प्रभाग समितीवर शिवसेनेच्या शिलेदारांनी दणक्यात विजय मिळवला. त्यांच्याविरोधात एकाही पक्षाच्या उमेदवाराने अर्ज न भरल्याने शिवसेनेच्या कारभाऱयांचाच विजय झाला. प्रभाग समित्यांमध्ये भगवे वातावरण होते. ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी शिवसैनिकांनी प्रभाग समित्या दणाणून सोडल्या.

एफ/दक्षिण आणि एफ/उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रल्हाद आबा ठेंबरे यांचा एकमेव अर्ज सादर झाला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. या प्रभागात शिवसेनेचे १०, भाजपचे ३ आणि काँग्रेसचे ४ सदस्य आहेत.

जी/दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी आशीष चेंबूरकर यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांचीही या प्रभाग समितीवर बिनविरोध निवड झाली. या प्रभागात शिवसेनेचे ६ तर मनसेचा १ सदस्य आहे. आर/उत्तर आणि आर/मध्य प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या उमेदवार शीतल म्हात्रे या बिनविरोध निवडून आल्या. या प्रभागात शिवसेनेचे ९, भाजपचे ८ तर काँग्रेसचा १ सदस्य आहे.

ए, बी आणि ई प्रभाग समितीवर अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांचा विजय झाला. सी आणि डी प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्या ज्योत्स्ना मेहता यांची निवड झाली. पी/दक्षिण प्रभाग समितीवर भाजपच्या राजुल देसाई निवडून आल्या. पी/उत्तर प्रभाग समितीसाठी भाजपच्या दक्षा पटेल यांची निवड झाली तर आर/दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्या कमलेश यादव यांची निवड झाली.

पी/दक्षिण, पी/उत्तर, आर/दक्षिण, आर/उत्तर आणि आर/मध्य प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी तर ए, बी आणि ई, सी तसेच डी, एफ/दक्षिण व एफ उत्तर तसेच जी/दक्षिण प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी कामकाज पाहिले.

आपली प्रतिक्रिया द्या