आरोग्य संचालकांना वारकऱ्यांनी हुसकावून लावले

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

आषाढी बैठकीचे निमित्त काढून श्री विठ्ठल दर्शन करण्यासाठी आलेले राज्याचे आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार आणि उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांना विठ्ठल काही पावला नाही. डॉ पवार आणि डॉ देशमुख आपल्या डझनभर अधिकाऱ्यांना खुश्कीच्या शॉर्टकट मार्गाने श्री विठ्ठल मंदिरात जाण्याचा प्रयन्त होते. मात्र व्हीआयपी गेटवर उपस्थित वारकरी आणि पत्रकारांनी या व्हीआयपीना हुसकावून लावल्याने श्री विठ्ठलाच्या दर्शनाची तहान संत नामदेवांच्या दर्शनावर भागवावी लागली.

येत्या दि. ४ जुलैला आषाढी एकादशीचा महासोहळा संपन्न होतोय सुमारे पंधरालाख भाविकांची उपस्थिती अपेक्षित धरून प्रशासनाच्या सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मात्र पंढरीचे कॉटेज रुग्णालय कोम्यात असल्याने ते वारी पूर्वी कार्यान्वित करा अशी मागणी वारकरी प्रतिनिधी आणि पत्रकारांनी वारीच्या निमित्ताने बोलविण्यात आलेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीत केली होती.

विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी या मागणीची दाखल घेत दि. २० जून पूर्वी वारीच्या निमित्ताने लागणाऱ्या आवश्यक त्या आरोग्य सुविधा सज्ज ठेवा अशी तंबी दिलेली होती. वारी अवघ्या सात दिवसावर येऊन ठेपली तरी शंभर खाटांच्या रुग्णालयात पुरेसे डॉक्टर नाहीत. अतिदक्षता विभागास सर्व आवश्यक सेवांचा बोजवारा उडाला असल्याने, किरकोळ दुखापत झालेला रुग्ण उपचारासाठी आला तरी त्याला सोलापूरला जाण्याचा रस्ता दाखविला जातो.

गेल्याच आठवड्यात याच रुग्णालयामध्ये एक बेवारस प्रेत पोत्यात बांधून ठेवलेले आढळून आले होते. हे प्रकरण राज्यभर गाजल्याने,वारीच्या नियोजनाचे निमित्त काढून राज्याचे आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार आणि उपसंचालक डॉ. संजय देशमुख आज पंढरपूर मध्ये आले होते.

कॉटेज रुग्णालयाला भेट देऊन त्यांनी उपस्थित असलेल्या डॉक्टरांकडून आढावा घेतला. डॉ. पवार कागदावरचे नियोजन पाहून खुश झाले पण प्रत्येक्षात या सुविधा वारकऱ्यांना मिळणार आहेत का गंज लागणारी यंत्र काम करणार आहे का याची शहनिशा न करता पवारांनी रुग्णालयाचा निरोप घेतला. जाताना पत्रकारांनी त्यांना हटकले मात्र आपल्याला देवाच्या दर्शनाला जायचे आहे असे सांगत त्यांनी पत्रकारांच्या गाऱ्हाण्याकडे दुर्लक्ष केले.

चार आलिशान गाड्या घेऊन पवार साहेब गर्दीतून वाट काढीत मंदिराजवळ आले. मंदिराजवळ वारकऱ्यांची तोबा गर्दी असताना या गाड्या सोडणे अपेक्षित नव्हते पण शासनाचे जावई असल्याच्या थाटात ही मंडळी दाखल झाली.

दर्शनासाठी कोणीतरी व्हीआयपी आले आहेत हे लक्षात येताच वारकऱ्यांनी त्यांना घेरले. नामदेव पायरी शेजारील एका खुष्कीच्या शॉर्टकट मार्गाने श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी घुसण्याचा त्यांचा प्रयन्त सुरु झाला. तेंव्हा वारकऱ्यांनी या सरकारी भक्तांना अक्षरशः हुसकावून लावले. यावेळी काही पत्रकारही उपस्थित होते. दि. २५ जून ते १३ जुलै या कालावधीत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनाने घेतला आहे.

या निर्णयानंतर डॉक्टरांना प्रवेश दिला जाणार का यासाठी वारकरी आणि पत्रकार नजर ठेवून होते. मात्र मंदिर व्यवस्थापन आणि पोलीस यंत्रणेकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी मंदिराबाहेरील संत नामदेव महाराज यांच्या पायरीचे दर्शन घेऊन परतले.