शालेय शिक्षण विभागात सुरू असलेल्या अनागोंदीविरोधात राज्य शिक्षक सेनेने आज मुंबई पश्चिम विभाग शिक्षण निरीक्षक कार्यालयाबाहेर इशारा आंदोलन केले. जुनी पेन्शन योजना लागू करा, नवीन संच मान्यतेचे निकष बदला, आश्वासित प्रगती योजना लागू करा, विनाअनुदानित शाळांना 100 टक्के अनुदान द्या, कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करा, याशिवाय अनेक मागण्यांसाठी शिक्षक सेनेच्या वतीने राज्यभर जोरदार आंदोलन करण्यात आले.
शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष व आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर हे इशारा आंदोलन करण्यात आले. शासनाच्या शिक्षण विरोधी परिपत्रकांमुळे तसेच शासन निर्णयामुळे राज्यातील अनुदानित व सरकारी शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सरकारने या आंदोलनाची दखल घेत प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही केली नाही तर भविष्यात शिक्षक सेनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा ज. मो. अभ्यंकर यांनी दिला. यावेळी मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री या दोघांनाही तक्रारींची पत्र पाठवलेली आहेत.
आंदोलनात मुंबई अध्यक्ष अजित चव्हाण, सरचिटणीस मुरलीधर मोरे, कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे, मुकेश शिरसाठ, हितेंद्र चौधरी, लहू कोकणे, मंगेश पाटील, विशाल बावा, प्रमोद बगले, विजय सिंग, अमरुधीन सोलकर, मुनाफ, सत्तारखाँ पठाण, प्रकाश चव्हाण, लालजी यादव, स्वाती खैरे, सचिन जाधव, प्रशांत बचुटे, वीणा दोनवलकर, मिनल सरकाळे, जयसिंग कदम, गणेश कांबळे सहभागी झाले.