
आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामना हिंदुस्थान आणि श्रीलंकेमध्ये रंगणार आहे. कोलंबोमध्ये उद्या 17 सप्टेंबर रोजी हा सामना होणार आहे. हिंदुस्थानचा संघ आठव्यांदा विजतेपद मिळवण्यासाठी तर श्रीलंकेचा संघ विजेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरेल. याआधी दोन्ही संघामध्ये सुपर-4मध्ये झालेल्या लढतीत रोहितसेना श्रीलंकेवर 41 धावांनी विजय मिळवला होता. आता फायनलमध्येही हिंदुस्थानकडून तशाच कामगिरीची अपेक्षा क्रिकेटप्रेमींना आहे. मात्र या लढतीपूर्वी हिंदुस्थानला मोठा धक्का बसला आहे.
हिंदुस्थानचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याला दुखापत झाली आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत मैदानात उतरू शकणार नाही अशी माहिती माध्यमांनी दिली आहे. अक्षर पटेलच्या जागी वाशिंग्टस सुंदर याची संघात निवड करण्यात आली असून त्याला तातडीने श्रीलंकेमध्ये बोलावण्यात आले आहे.
‘क्रिकबझ’ने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षर पटेल अंतिम लढतीला मुकण्याची शक्यता आहे. सुपर-4च्या अखेरच्या लढतीत बांगलादेशविरुद्ध खेळताना त्याला दुखापत झाली होती. बांगलादेशविरुद्ध विकेट वाचवण्याच्या नादात त्याच्या हाताला दुखापत झाली होती. 46व्या षटकामध्ये हा प्रकार घडला होता.
अक्षर पटेल याने मेहंदी हसनच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळला. मात्र चेंडू लॉन्ग ऑनला गेला. तिथे तैनात तौहीद ह्रदॉय याने चेंडू पकडला आणि नॉन स्ट्रायकर एंडला फेकला. हा थ्रो अक्षर पटेल याच्या हातावर लागला आणि त्याला दुखापत झाली. यानंतर फिजिओ मैदानात आले आणि अक्षरच्या हातावर उपचार करून, टेप लावून बाहेर गेले. त्यानंतर अक्षर पटेल याने शेवटपर्यंत शड्डू ठोकून संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो 49 व्या षटकामध्ये तो 42 धावांवर बाद झाला आणि हिंदुस्थानच्या हातातून सामना निसटला.
दरम्यान, आशिया चषकावर हिंदुस्थानने सात वेळा नाव कोरले आहे. 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016 आणि 2018मध्ये हिंदुस्थानचा संघ विजयी झाला होता. तर श्रीलंकेने सहा वेळा विजेतेपद पटकावले आहे. 1986, 1997, 2004, 2008, 2014 आणि 2022 श्रीलंकेने विजय मिळवला होता.