सुंदर खेळला! मात्र शतकाचे स्वप्न अपूर्ण, हिंदुस्थानकडे 160 धावांची आघाडी

हिंदुस्थानी संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंतने खणखणीत शतक झळकावत क्रिकेटरसिकांना खूश केले.  त्याने रचलेल्या पायावर कळस चढवण्याचे काम अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने केले.  सुंदरने शनिवारीही दमदार फलंदाजी केली, मात्र त्याला शतक झळकावता आले नाही. तीन बळी झटपट गेल्याने सुंदरला स्ट्राईक मिळाला नाही, ज्यामुळे तो 96 धावांवरच नाबाद राहिला. अक्षर पटेल बाद झाल्यानंतर इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज यांचे बळी बेन स्टोक्सने झटपट घेतले. एकाच षटकात त्याने पटेल, शर्मा आणि सिराज यांना बाद केले.

अहमदाबाद येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेरीस हिंदुस्थान फ्रंटफूटवर उभा आहे. यष्टिरक्षक रिषभ पंत व अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर या जोडीने सातव्या विकेटसाठी 113 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत हिंदुस्थानचा पहिला डाव सावरत पहिल्या डावात मोलाची आघाडी मिळवून दिली होती. रिषभ पंतने 101 धावांची खेळी साकारताना इंग्लंडच्या गोलंदाजांचे आव्हान समर्थपणे थोपवून लावले. तो बाद झाल्यानंतर त्याची गादी वॉशिंग्टन सुंदरने चालवायला घेतली. अक्षर पटेलच्या मदतीने त्याने हिंदुस्थानी संघाची आघाडी 160 धावांपर्यंत वाढवली.  इंग्लंडच्या पहिल्या डावातील 205 धावांना प्रत्युत्तर देताना हिंदुस्थानी संघाचा डाव 365 धावांवर आटोपला.

हिंदुस्थानी संघातील 4 फलंदाज हे शून्यावर बाद झाले असून यामध्ये सलामीवीर शुभमन गिल आणि कर्णधार विराट कोहली यांचाही समावेश आहे. इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज यांनाही खाते उघडता आले नाही. इंग्लंडच्या गोलंदाजांबाबत बोलायचे झाल्यास बेनस्टोक्सने 4 बळी तर जेम्स अँडरनसने 3 बळी टीपले. फिरकीपटू जॅक लीचला 2 बळी टीपता आले.

आपली प्रतिक्रिया द्या