जलसंधारणामुळे दुष्काळी स्थ‍ितीतही राज्यात लक्षणीय कृषी उत्पादन- मुख्यमंत्री

सामना ऑनलाईन । मुंबई

जलसंधारणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने लक्षणीय कामग‍िरी केल्याने मागील वर्षी कमी पाऊस होऊनही राज्यात सुमारे 116 लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे उत्पादन घेतल्याचे माह‍िती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीती आयोगाच्या बैठकीत दिली. तसेच राज्याला भेडसावणाऱ्या दुष्काळी पर‍िस्थ‍ितीच्या निवारणासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांची माह‍ितीही त्यांनी दिली. यावेळी आजवरची सर्वाध‍िक अशी 4 हजार 700 कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारने दुष्काळ निवारणासाठी द‍िल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारचे आभार मानले.

राज्यात भेडसावत असलेल्या दुष्काळी पर‍िस्थ‍ितीच्या निवारणासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांची माह‍िती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. महाराष्ट्रात पाणी टंचाई जाणवणाऱ्या सर्व गावे आणि वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करण्यासोबतच चारा छावण्या सुरु करण्यात आल्या असून दुष्काळी भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी विविध सवलती देण्यात आल्या आहेत. भव‍िष्यातील आवश्यकता लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर वनीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील मराठवाडा-विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात कृत्रिम पाऊस पाडण्याची योजना सरकारने आखली असून त्‍यासाठी एयर क्लाऊड सीडिंग तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. या योजनेसाठी 30 कोटींची तरतूद शासनाने केली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नवी द‍िल्ली येथे राष्ट्रपती भवनात नीती आयोगाच्या प्रशासकीय समितीची 5 वी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडली. यावेळी नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भूपृष्ठ व रस्ते वाहतूक तथा सूक्ष्म, मध्यम व लघू उद्योग मंत्री नितीन गडकरी, अन्य केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, नायब राज्यपाल उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध विषयांवरील सादरीकरण करुन राज्याच्या कामगिरीची माह‍िती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या