नवी मुंबईत मंगळवारी पाणीबाणी, भोकरपाड्यातील एमबीआरमध्ये नवीन पाइपलाइन टाकणार

भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील एमबीआरमध्ये नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम येत्या मंगळवारी हाती घेण्यात येणार आहे. तसेच मुख्य पाइपलाइनवरील व्हॉल्वही बदलले जाणार आहेत. त्यासाठी नवी मुंबई शहराचा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी 9 पासून बुधवारी पहाटे 3 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

नवी मुंबई शहराला खालापूर परिसरातील मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मोरबे धरणातील पाणी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून नवी मुंबई शहरात येते. येत्या मंगळवारी 4 नोव्हेंबर रोजी या केंद्रातील एमबीआरमध्ये नवीन पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाइपलाइनवरील काही व्हॉल्व खराब झाले आहेत. हे व्हॉल्वही बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

बुधवारी कमी दाबाने पाणी

दुरुस्तीच्या कालावधीत बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली विभागातील नळ कोरडे राहणार आहेत. बुधवारी सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन शहर अभियंता विभागाने केले आहे.