नागपूरमध्ये भीषण पाणीटंचाई, ‘डेड स्टॉक’ संपण्याच्या मार्गावर; दिवसाआड पाणीपुरवठा

57

सामना प्रतिनिधी । नागपूर

नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पेंच प्रकल्प आणि कन्हान नदी प्रकल्पांनी तळ गाठला असून उन्हाळ्यात तोतलाडोह धरणांमधील मृत साठ्यावर (डेड स्टॉक) शहराची तहाण भागविण्यात आली. मात्र, आता ते देखील पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. पाणीटंचाईची भीषण स्थिती निर्माण झाल्यामुळे आता शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार, शुक्रवार, रविवार तीन दिवस शहराला पाणी पुरवठा तसेच टॅकरने पाणी पुरवठा होणार नाही अशी माहिती सत्त्तापक्षनेता संदीप जोशी यांनी पत्रकारांना दिली.

गतवर्षी पाऊस कमी पडला़ त्यामुळे महापालिकेचे पाण्याचे नियोजन कोलमडले. शहरात पाणीसमस्या अधिक तीव्र होत आहे़ शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या तोतलाडोह जलाशयाने तळ गाठला. अन्य प्रकल्पांचीही अवस्था अशीच आहे. पाणी मिळण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर जून महिन्यात डेड स्टॉक मधूनच पाणी घेण्याची वेळ आली. धरणाच्या तळाशी काही पाणीसाठा शिल्लक असतो. हा साधारत: 15 टक्के पाणीसाठा राखीव असतो. धरणाच्या तळाशी असलेला पाण्याचा साठा गुरुत्वाकर्षणशक्तीने पुढे जात नाही. पंप लावून हा पाणीसाठा उपसावा लागतो. सुरक्षित जलसाठा म्हणून हा जलसाठा ओळखला जातो. शक्यतो या पाणीसाठ्याला हात लावला जात नसतो. 2006 नंतर प्रथमच अशी वेळ आली आहे.

दरम्यान, डेड स्टॉकमधून 30 एमएमक्यूब पाणी उचलण्याची परवानगी महापालिकेला मिळाली होती. यातून शहराला दररोज 1.26 एमएमक्यूब (घनमिटर)पाणी देण्यात आले. मान्सून वेळेवर येईल, त्यामुळे शहरात पाणीकपात करण्याची वेळ येणार नाही, असा महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचा कयास होता. मात्र, पाऊस लांबल्यामुळे आता महापालिकेची पंचाईत झाली आहे. शहरात दररोज 650 दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा होत आहे. दररोज इतकाच पाणीपुरवठा सुरू राहिल्यास येत्या काळात शहराची पाणीकोंडी होऊ शकते, त्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय सोमवारी जलप्रदाय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

सोमवारी होणार पुन्हा बैठक
आठवड्यात बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे तीन दिवस पाणी मिळणार नाही. शिवाय टँकरद्वारे देखील पाणीपुवठा होणार नाही, असे सत्तापक्षनेते संदीप जोशी व जलप्रदाय समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके यांनी पत्रकारपरिषदेत दिली. सोमवारी जलप्रदाय विभागातील अधिकारी आणि मनपातील पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी काळात एक दिवसाआड पाणीपुवठा नियमित ठेवायचा की अन्य काही पर्याय शोधता येईल, यासंदर्भात विचार केला जाईल, असे जोशी यांनी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या