अखेर पाणीप्रश्न मार्गी लागला, कळवणसह देवळा तालुक्यातील गावकऱ्यांच्या प्रयत्नांना यश

58

सामना ऑनलाईन, कळवण

चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडावे या कळवणसह देवळा तालुक्यातील गावकऱ्यांच्या मागणीला अखेर न्याय मिळाला आहे. सकाळी ११ वाजता या धरणात पाणी सोडण्यात आल्यानंतर एकच जल्लोष करण्यात आला.

कळवण तालुक्यातील अभोणा, कुंडाणे, विठेवाडी, दह्याने, बार्डे, पाळे बुद्रुक, साकोरे, मानूर, कळवण खुर्द, दह्याने, निवाणे, भेंडी, वरवंडी व देवळा तालुक्यातील काही गावांतीच्या शिवारातील शेतकऱ्यांनी चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याकडे केली होती. या गावातील जनावरांच्या व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. नागरिकांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी यांचेकडे पाणी सोडण्याबाबत विनंती करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ८० दाशलक्ष घनफूट पाणी सोडण्याची परवानगी दिल्याने चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले.

आज कालव्याला पाणी सोडल्याने अभोणा, कुंडाणे, विठेवाडी, बार्डे, पाळे बुद्रुक, साकोरे, मानूर, कळवण खुर्द, दह्याने, निवाणे, भेंडी, वरवंडी व देवळा तालुक्यातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
यावेळी आमदार जे. पी. गावित, कॉम्रेड हेमंत पाटील, संतोष देशमुख, बाळासाहेब गांगुर्डे आदींसह शेतकरी बांधव व नागरिक उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या