आता हेच राहिलं होतं… महाराष्ट्रातील ‘या’ गावात रेशनकार्डावर मिळतंय पाणी

95

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

आतापर्यंत धान्य, तेल यासाठी रेशनकार्डाचा वापर आपण ऐकून होतो. परंतु आता चक्क पिण्याच्या पाण्यासाठी रेशनकार्डाचा वापर शेगाव तालुक्यातील चिंचोली या गावात सुरु झाला आहे. प्रत्येक रेशनकार्डावर दोनशे लिटर पाणी पोलीस बंदोबस्तात वाटप करण्यात येत आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील चिंचोली येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाकडून टँकरद्वारे पाणी वितरण करण्यात येत आहे. दरम्यान, पाण्यासाठी होत असलेली भांडणं आणि संघर्ष पाहता पोलीस बंदोबस्तासह समस्त गावकर्‍यानी आता रेशन कार्डवर पाणी वितरणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टँकरच्या पाण्याचे वितरण रेशन कार्ड वर करण्यात येत आहे.

water

अत्यल्प पावसामुळे चिंचोलीतील विहिरी, बोअरवेल, नाले कोरडेठण्ण पडले असून परिसरातील पाण्याचे सर्व स्त्रोत आटलेत. ऐन पावसाळ्यातही या ठिकाणी पाण्यासाठी संघर्ष कायम होता. त्यामुळे सरपंच संजय इंगळे यांच्यासह पंचायत समिती सदस्य आणि स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामसेवक संजय हाके यांनी पंचायत समिती व तहसिल कार्यालयात पाणी टंचाईचा अहवाल सादर केला. जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या निदर्शनासही ही बाब आणून दिली. त्यानंतर या गावात पाण्याचे टँकर सुरू झाले. मात्र, टँकरचे पाणी भरण्यासाठी होत असलेली चढाओढ आणि संघर्ष पाहता या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये पाण्याचे वितरण करण्यात येत होते. तरीही पाण्यासाठी भांडण होतच होते म्हणून भांडण तंटा होऊ नये याकरता रेशन कार्डवर पाणी वाटप हा प्रभावी उपाय ठरू शकेल. म्हणून सर्वनुमते रेशकार्ड वर प्रत्येकी 200 लिटर पाणी विचारणाचा निर्णय घेण्यात आला आहे. टँकर गावात येण्यापूर्वीच लागतात रांगापाण्याचा टँकर गावात येण्यापूर्वीच सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरापासून नागरिक या टँकरवर झडप मारतात. यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेता, तसेच सर्वांना समान पाणी वाटपासाठी रेशन कार्ड द्वारे पाणी वितरण करण्यास सुरुवात झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या