जलदा: आरोग्यदायी पाणी

डॉ. अप्रतिम गोएल

उद्या जागतिक जल दिन आहे. आपल्या सौंदर्याचा, आरोग्याचा पाया पाणी आहे.

पाणी…मनुष्यासह सृष्टीतील सर्व जीव, वनस्पती यांना जगण्यासाठी पाण्याची गरज भासते. हवा आणि अन्नाइतकेच प्रत्येकाच्या जीवनात पाण्याचे मूलभूत महत्त्व आहे. पाणी पिण्याने आरोग्य आणि सौंदर्य अबाधित राहते. याकरिता अनेक शारीरिक आजार, सौंदर्यप्रसाधने, औषधे यामध्ये पाण्याचा वापर केला जातो.

पाण्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकली जातात. शिवाय त्वचेला आवश्यक पोषक द्रव्ये शरीरात पाण्यामुळेच शोषून घेतली जातात. पाण्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते. भरपूर पाणी प्यायल्यामुळे कोरडय़ा त्वचेत ओलावा टिकून राहतो, शरीराचे तापमान टिकून राहते आणि सुरकुत्यांसारखी वाढलेल्या वयाची लक्षणेही लवकर दिसत नाहीत. एकंदरीत माणसाला निरोगी आणि चमकदार त्वचा प्राप्त करून देण्यासाठी पाणी गरजेचे आहे.

सौंदर्यप्रसाधनांमध्ये पाणी  

त्वचा मुलायम राहण्याकरिता आणि त्वचेचा पोत सुधारण्याकरिता पाणी आवश्यक आहे. याकरिता सौंदर्यप्रसाधनांमध्ये पाण्याचा वापर केला जातो. त्वचेसाठी असलेली प्रे, टॉनिक्स इत्यादी जी काही ‘तेलमुक्त’ सौंदर्यप्रसाधने आहेत त्यामध्ये विशेषतः पाणी वापरले जाते. कारण पाण्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

तुकतुकीत, उजळ, चमकदार त्वचा हे निरोगी त्वचेचं रहस्य आहे. बाजारात त्वचा स्वच्छ करण्यासाठी जेल क्लिन्झर, क्लिन्झिंग मिल्क आणि ऑइल क्लिन्झर इत्यादी उत्पादने उपलब्ध असतात. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही जेल क्लिन्झर वापरू शकता. विशेष म्हणजे जेल क्लिन्झरमध्ये पाण्याचा वापर केला जातो. कापसाच्या बोळ्यावर हे जेल घेऊन ते रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावावे. यामुळे त्वचा मऊ होऊन स्वच्छ होते.

पाण्यामुळे त्वचा, केस, नखे यांची अंतर्गत स्वच्छता होते. हे अवयव नैसर्गिकरीत्या  लवचिक,चमकदार होतात.

त्वचेसाठी उपयुक्त

सतत घाम, लघवी, श्वासाद्वारे शरीरातील दूषित घटक बाहेर फेकले जातात. त्वचेला (शरीराला) सतत चांगल्या पाण्याची आवश्यकता असते. शरीरातल्या  पेशींसाठीही पाणी महत्त्वाचे आहे. लिंबू-पाणी त्वचेची कांती उजळवण्यास अत्यंत गुणकारी आहे. लिंबू पाण्यामुळे रक्तशुद्धी होते. नवीन रक्तपेशी निर्माण करण्याची क्षमता वाढून त्वचेचा पोत सुधारते. तर मध आणि पाणी विषारी घटक काढून त्वचेला पुनरुज्जीवित करतात.

व्यायामानंतर नारळपाणी प्या

व्यायाम केल्यानंतर नारळपाणी प्या. नारळपाण्यात प्रेजर्वेटिव्हस किंवा कृत्रिम साखर नसल्यामुळे हे एक नैसर्गिक स्पोर्टस ड्रिंक आहे. यामुळे उत्साही राहण्यास मदत होते. यात कमी कॅलरीज आणि पोटॅशिअम असते. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास नारळपाणी मदत करते.

पाण्याचा औषधी वापर

लहान मुलांच्या व महिलांच्या विविध विकारांत, वजन घटणे, गंडमाळा, भूक नसणे, वाढ न होणे, कॅन्सरसारख्या गाठीच्या विकारात अंतरिक्ष जल, सुंठ सिद्ध जल, नागरमोथा चूर्णयुक्त पाणी असे पाणी या विकारांत घेतल्याने हे विकार लवकरच काबूत आणता येतात.

आपली प्रतिक्रिया द्या