जीवनशैली….व्यायाम करताना पाणी हवेच!

संग्राम चौगुले

कोणताही व्यायाम करताना मधे थोडे पाणी प्यायलाच हवे…

आपले शरीर हे ७० टक्के पाण्याने बनलेले आहे. त्यामुळे पाण्याचे आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी महत्त्व किती आहे ते वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. पण व्यायाम करण्यापूर्वी किंवा व्यायाम केल्यानंतर पाण्याचे किती महत्त्व आहे ते जाणून घेणे गरजेचे आहे.

व्यायाम किंवा कोणत्याही प्रकारचे अवजड काम करताना लागणारे पाणी शरीर आपल्या स्नायूंकडून मिळवते. कारण व्यायामामुळे शरीराला घाम येतो. तेव्हाही पाणी बरेचसे निघून जाते. त्यामुळे स्नायू थकतात. म्हणूनच तर आपल्याला थकल्याची जाणीव होते. अशा स्थितीत व्यायाम करताना घामाद्वारे पाणी निघून जाते. त्यामुळे आपल्याला पाण्याची आवश्यकता भासते. शरीरात पाणी जाणं गरजेचे होते. शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवायचे तर पाणी हवेच. आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा आपले शरीर गरम होते. ते पूर्वपदावर आणण्यासाठी शरीराला पाण्याची गरज लागते. घाम येतो ते त्याचाच परिणाम आहे. घामाच्या पाण्यातून त्वचेला पाण्याची गरज पूर्ण होते. पण ते पाणी आपल्याच शरीरातून आलेले असते. पण यामुळे शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडते. त्यासाठी व्यायाम करताना पाणी पिण्याची आवश्यकता असते.

व्यायाम करताना आपला घसा सुकतो. कोरडा पडतो. त्यामुळे तो नीट काम करण्यासाठी पाण्याचे दोन-तीन घोट पिणे चांगले ठरते. त्यामुळे एकूणच पाण्याचे शरीरासाठी महत्त्व असल्याने व्यायाम करतानाही पाणी आवश्यक असते. मनुष्य एकवेळ अन्नाशिवाय बराच काळ राहू शकेल, पण पाण्याशिवाय कुणालाच राहाता येणार नाही. व्यायाम करताना किंवा त्यापूर्वी वा त्यानंतर पाणी पिणे आवश्यकच असते. कारण शरीरातील पाण्याची कमतरता व्यायामाच्या क्षमतेवर परिणाम करू शकते. या पाण्याचे महत्त्व किती आहे हे तपासून पाहायचे असेल तर पाणी पिऊन पुल डाऊन, बेंच प्रेस, ओव्हरहेड प्रेस यापैकी एखादा व्यायाम करून पहा.. कधीतरी हे सर्व व्यायामप्रकार केल्यानंतर पाणी पिऊन बघा. फरक जाणवेल.

किती पाणी प्यायचे?

व्यायाम करताना किंवा त्याआधी वा नंतर किती पाणी प्यायचे याचे ठरावीक उत्तर देता येणार नाही. कारण ते पूर्णपणे व्यायाम करणाऱया व्यक्तीच्या वयावर, उंचीवर किंवा स्त्री वा पुरुष यावर अवलंबून असते. पुरुषांना स्त्रियांच्या तुलनेत पाण्याची गरज जास्त लागू शकते. तरीही साधारणपणे २० ते ३० मिनिटांचा व्यायाम झाल्यानंतर माणसाला २०० ते ३०० एमएल पाणी प्यायला पाहिजे. हे पाणी साधे असावे. ते खूप थंड असेल तर स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो. एकाचवेळी खूप पाणी प्यायचे नाही. थोडे थोडे आणि घोट घोट पाणी पिणे हिताचे असते. व्यायाम करण्यापूर्वी पाणी न पिणे हाही एक योग्य उपाय होऊ शकतो. वेटलिफ्टिंग करत असाल तर जास्त पाणी प्यायले तरी हरकत नाही, पण तुम्ही कार्डिओ करत असाल तर जास्त पाणी पिणे घातक ठरू शकते.