धरणांनी तळ गाठला, पण चिंतेचे कारण नाही

12

सामना ऑनलाईन, पुणे

उन्हाचा चटका वाढताच धरणातील पाणीसाठा वेगाने खालावत होते. धरणे तळ गाठू लागली असली तरी अनेक प्रमुख धरणांमध्ये यंदा पुरेसा साठा आहे. राज्यातील मोठे, मध्यम, लघु प्रकल्पांमध्ये मिळून ३२६.३९ टीएमसी म्हणजेच २२.७८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी अवघा धरणांमध्ये ९.१४ टक्के पाणीसाठा होता.

सततच्या दुष्काळामुळे गतवर्षी अनेक धरणं पूर्णपणे कोरडी पडली होती. मराठवाड्यात तर धरणांचा पाणीसाठा शून्य टक्क्यांपर्यंत खाली आला होता. पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती विभागात पाणीसाठा १० टक्क्यांपेक्षा कमी होता. केवळ कोकण विभागात २८.६४ टक्के पाणीसाठा होता. परतीच्या पावसाने जबरदस्त बॅटींग केल्याने मराठवाडा आणि विदर्भातील धरणे उशिराने का होईना पण तुडूंब भरली. धरणं उशिरा भरल्याने त्या धरणात पाणी बऱ्यापैकी शिल्लक आहे. या पावसामुळे उजनी, कोयना धरण ‘ओव्हरफ्लो’ झाले, तर जायकवाडी धरण अनेक वर्षांनतर भरले.

  • यंदा राज्यातील सर्वच विभागांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे.
  • मराठवाड्यात ७१ टीएमसी (२७.७० टक्के) पाणीसाठा आहे.
  • जायकवाडी धरणामध्ये यंदा १६ टीएमसी पाणी शिल्लक आहे.
  • पुणे विभागात सर्वाधिक ८९.७४ टीएमसी (१६.७२ टक्के) पाणीसाठा आहे.
  • कोयना धरणामध्ये १७.३३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे
  • उजनीचा पाणीसाठा मृतपातळीमध्ये गेला आहे.

राज्यातील १३८ मोठ्या प्रकल्पांमध्ये मिळून २१३.४५ टीएमसी (२०.८७ टक्के), मध्यम प्रकल्पांमध्ये ५०.९४ टीमएसी (२६.८९ टक्के) तर लघु प्रकल्पांमध्ये ६१.९९ टीएमसी (२८.०९ टक्के) पाणीसाठा असल्याचे राज्याच्या जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या