धुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प

33

सामना प्रतिनिधी । खेड

खेड तालुक्यात शनिवारी सायंकाळ पासून पावसाने जोरदार बरसायला सुरवात केली असून गेल्या काही तासांमध्ये झालेल्या धुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या नदीवरील पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली असल्याने मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

गेले तीन -चार दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार बरसायला सुरवात केली . चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने भरणे नाका परिसरात आवश्यक तिथे गटारांची कामे न केल्याने पाण्याचा मोठा लोंढा आला आणि त्यामुळे पुलाच्या भरावाचे दगड रस्त्यावर आले. इतकेच नव्हे तर ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे भरणे येथील जागृत देवस्थान काळकाई मंदीर व परिसर जलमय झाला आहे. ब्रिटीश राजवटीत बांधण्यात आलेला जगबुडी पुल 2005 ची अतिवृष्टी वगळता कधीही बंद झाला नव्हता मात्र चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या मेहरबानीमुळे गेल्या महिन्याभरात हा पूल पाचवेळा वाहतूकीस बंद करावा लागला आहे .

धुवाँधार पावसामुळे जगबुडी व नारिंगी या दोन्ही नद्यांची पातळी वाढल्याने खेड शहरातील तीन बत्ती नाका परिसरातील भाजी मंइई ही पाण्याखाली गेली आहे जगबुडीचे पाणी कधीही शहरात घुसण्याची शक्यता असल्याने व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे

आपली प्रतिक्रिया द्या