बोरी नदीतल्या वाळू उपशामुळे पाणीटंचाईचे संकट

244
प्रातिनिधिक फोटो

धुळे, (प्रतिनिधी)

शिंदखेडा तालुक्यातील बोरी नदीच्या पात्रातून बेसुमार वाळू उपसा होत आहे. त्याचा परिणाम पाणीटंचाईवर झाला आहे. शिवाय तालुक्यातील अनेक रस्त्यांची वाट लागली आहे. बेकायदा वाळू उपसा थांबवावा अशी मागणी वर्षभरापासून करण्यात येत आहे. पण वाळू तस्करी करणारे मुजोर झाले आहेत. वाळू व्यवसाय करणार्‍यांवर दुर्लक्ष केले जात असल्याने त्रयांच्यावर कारवाई करतानाच तहसीलदार गायत्री सौंदाणे यांचीही चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली. तसेच बोरी नदीपात्रातील वाळू उपशाची छायाचित्रे आणि चलचित्रफीत जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांना दिली.

शिंदखेडा तालुक्यातील बोरी, तापी आणि अन्य नदीपात्रातून बेसुमार वाळूचा उपसा होत आहे. शासनाने निर्धारीत केलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रात अडीच फुटांपेक्षा जास्त खोल खड्डे खोदून वाळूचा उपसा केला जात आहे. दिवसभरातून शंभर ते तीनशे ट्रॅक्टर आणि ट्रक भरून वाळूचा उपसा होत आहे. बेसुमार वाळू उपशामुळे नदीपात्रात पाणी राहत नाही. याचा परिणाम नदी काठावरील अनेकांना पिण्याचे पाणी मिळण्यावर झाला आहे. विशेष म्हणजे या बेकायदा वाळू उपशाप्रकरणी वर्षभरापासून तहसील कार्यालयात तक्रार केल्या आहेत.

वेळोवेळी छायाचित्रे आणि चलचित्रीकरणदेखील दिले, पण तहसील कार्यालयातून दखल घेतली जात नाही.
शिंदखेड्यातील तहसीलदारपदावर गायत्री सौंदाणे आल्यापासून मोठ्या प्रमाणार वाळू उपसा होत आहे. पाच ते सहा फुट खोल खड्डे खोदले जात आहेत. त्यामुळे नदीपात्राला खदानीचे स्वरूप आले आहे.

शिंदखेड्यातील वाळू थेट ठाणे, मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये पोहोचविली जाते. त्यातून वाळू तस्कर लाखो रुपये मिळवितात. सर्व परिस्थिती तहसीलदार गायत्री सौंदाणे यांना माहीत आहे. पण वाळू तस्करांचाच वावर तहसील कार्यालयात वाढला आहे. त्यामुळे वाळू उपशाबाबत तक्रार करणार्‍या सर्वसामान्यांना वाळू तस्करी करणारे धमकावतात. त्यामुळे सामान्य मनुष्य आणि संघटना तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या