पालिकेचा पाणीपुरवठा बंद करणार्‍या शेलार यांना ताकीद द्या

81

पुणे, (प्रतिनिधी)

महापालिकेला कोणतीही पूर्वसूचना न देता शहराचा पाणीपुरवठा बंद करणार्‍या जलसंपदा विभागाचे अभियंता पांडुरंग शेलार यांना सक्त ताकीद देऊन त्यांच्याकडून खुलासा मागवावा, असे पत्र पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने खडकवासला सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांना पाठविले आहे.

खडकवासला धरणातून घेतल्या जाणार्‍या पाण्याबाबत जलसंपदा विभाग आणि महापालिका प्रशासन यांच्यात चर्चा करण्याचे ठरलेले असतानाही याकडे दुर्लक्ष करीत शेलार यांनी पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात जाऊन पाण्याचे गेट बंद केले. अचानकपणे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे दोन दिवस शहरातील मध्यवर्ती भागातील पाणीपुरवठा खंडित झाला होता. यामुळे पुणेकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. जलसंपदा विभागातील अभियंता शेलार यांनी केलेल्या कृतीबद्दल गेल्या आठवड्यात झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार पडसाद उमटले. पालिकेला कोणतीही कल्पना न देता अशा पद्धतीने शहराचा पाणीपुरवठा बंद केला जात असेल, तर संबंधित अधिकार्‍याच्या विरोधात पोलिसांत तक्रार देऊन फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सभासदांनी केली होती.

जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍याच्या मनमानी कारभाराबाबत जलसंपदा विभाग, राज्य सरकार यांना नाराजीचे पत्र पाठवून या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल करता येईल का? याची शहानिशा करण्याचा आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी पालिका प्रशासनाला दिला होता. सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी व्यक्त केलेल्या भावनांच्या पार्श्‍वभूमीवर पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख विजय कुलकर्णी यांनी खडकवासला सिंचन विभागाच्या अधीक्षकांना पत्र पाठविले आहे. चुकीच्या पद्धतीने शहराचे पाणी बंद करून पुणेकरांना वेठीस धरणार्‍या शेलार यांना सक्त ताकीद देऊन त्यांच्याकडून खुलासा घ्यावा, असे या पत्रात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या