पारनेर तालुक्याचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी राजकिय ताकद पणाला लावू : विजय औटी

66

सामना प्रतिनिधी । पारनेर

तालुक्याचा पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सर्वांनी आपसातील मतभेद दूर ठेवून एकत्रित काम करण्याची गरज असल्याचे सांगतानाच पाणीप्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठी राजकिय ताकद पणाला लावणार असल्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांनी सांगितले.

टाकळीढोकेश्‍वर येथील बांडेवस्तीच्या बनाई मंदीरासमोर 10 लाख रूपये खर्चून उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण, इंदीरा कॉलनी रस्ता काँक्रीटीकरणाचे भुमिपुजन औटी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, जवळच असलेल्या ढोकी येथे नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाचे रविवारी लोकार्पण करण्यात येणार असून इच्छा शक्ती असेल तर आपण काहीही करू शकतो हे या कामातून सिद्ध झाले आहे. वनविभागाची अडचण दुर करून हे काम मार्गी लावण्यात आपणास यश आले याचे समाधान आहे. कायम दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या आपल्या तालुक्याची ही ओळख पुसण्यासाठी पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी आपसातील मतभेद दुर ठेवून एकत्रित काम करण्याची गरज आहे. स्वातंत्रप्राप्तीपासून शेती विकासासाठी पाण्याचे स्वतंत्र मंत्रालय नव्हते. पंतप्रधान मोदी यांनी स्वतंत्र जलव्यवस्थापन मंत्रालय निर्माण केले. या मंत्रालयाच्या माध्यमातून पश्‍चिम घाटाचे पाणी मिळविण्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठी राजकिय ताकद पणाला लावू अशी ग्वाही त्यांनी दिली.

औटी यांनी मांडओहळ नदीवर गेल्या वर्षी चार बंधारे बांधून दिले असून यंदाही चार बंधाऱ्यांना मंजुरी मिळाली आहे. या गटाच्या विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी त्यांनी कोट्यावधी रूपयांचा निधी दिल्याचे जि. प. सदस्य काशिनाथ दाते यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी जि. प. सदस्य काशिनाथ दाते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख विकास रोहोकले, सिताराम खिलारी, अशोक कटारिया, चंद्रभान चिकणे, बबन पायमोडे, सरपंच सुनिता झावरे, महेश पाटील, जयसिंग झावरे, विलास झावरे, डॉ. भाउसाहेब खिलारी, लक्ष्मीकांत खिलारी, श्रावण गायकवाड, सचिन अल्हाट, प्रमोद खिलारी, दादा ठुबे, बबन वाळूंज आदी यावेळी उपस्थित होते. बबन पायमोडे यांनी सुत्रसंचलन तर सुनिता झावरे यांनी आभार मानले.

आपली प्रतिक्रिया द्या