संभाजीनगरसह ५ जिल्ह्यांना टंचाईच्या झळा

15

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

उन्हाळी हंगामाच्या प्रारंभीच मार्च महिन्यातच संभाजीनगरसह ५ जिल्ह्यांना टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. विभागातील २०५ गावांना २५२ टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे, त्यासाठी प्रशासनाने ३४० खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. सर्वाधिक टंचाईची झळ संभाजीनगर जिल्ह्यास बसली आहे.

मराठवाडा विभागात यंदा सरासरी ८३ टक्के पाऊस झाला. हा पाऊस सर्व जिल्ह्यात समप्रमाणात झाला नाही. कमी – अधिक पावसाचे प्रमाण राहिल्याने काही तालुक्यांना उन्हाळा सुरू होण्यापूर्वी टंचाईचा सामना करणे भाग पडले आहे. त्यात संभाजीनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. या जिल्ह्यात मार्च महिन्यातच २०६ टँकर्स सुरू करणे प्रशासनास भाग पडले आहे. या जिल्ह्यातील १६९ गावांतील नागरिकांची तहान हेच टँकर्स भागवीत आहेत. त्यानंतर जालना, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा क्रम लागतो. या जिल्ह्यांनाही टँकर्सने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

२७ टँकर्स वाढले
मराठवाडा विभागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्यामुळे प्रशासनाने मागणीनुसार टँकर्सने पाणीपुरवठा सुरू केला आहे. सध्या विभागात २५२ टँकर्स सुरू असून, गत आठवड्यात २२५ टँकर्स सुरू होते. आठ दिवसांत २७ टँकर्स वाढले आहेत. यामध्ये २१२ खासगी आणि ४० शासकीय टँकर्सचा समावेश आहे.

३४० खासगी विहिरींचे अधिग्रहण

मराठवाडा विभागातील तहानलेल्या नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने टँकर्स सुरू करण्यात आले आहेत. हे टँकर्स भरण्यासाठी प्रशासनाने खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. आतापर्यंत ३४० खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, सर्वाधिक १८३ विहिरींचे संभाजीनगर जिल्ह्यात अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ नांदेड-९७, परभणी – ३७, जालना – १५ आणि हिंगोली जिल्ह्यात ८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या