ग्रामसेविकेची हलगर्जी भोवली, भरउन्हात हंडाभर पाण्यासाठी पायपीट

16

सामना ऑनलाईन,इगतपुरी

तालुक्यातील मौजे कुर्णोली येथील तेलमवाडीतील गोरगरीब आदिवासींना ग्रामसेविकेच्या हलगर्जीमुळे भरउन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे आणि शासनाच्या नागरी सुविधांपासून व त्यांच्या हक्कापासून त्यांना वंचित ठेवले जात असल्याने त्यांच्यात रोष निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासनाला दोन महिन्यांपूर्वी ग्रामस्थांनी लेखी कळवूनही दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन दिले.

कुर्णोली ग्रामपंचायतीमधील तेलमवाडी ही आदिवासीवाडी असून कुर्णोली ग्रामपंचायतीचे ग्रामसेविका शासनाच्या विविध योजनांपासून वंचित ठेवत आहे. शासनाच्या कोणत्याही योजनांची माहिती त्यांना देण्यात येत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी वेळोवेळी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करत असून महिलांना हंडाभर पाण्यासाठी भर उन्हात एक-एक किलोमीटर भटकंती करावी लागत आहे. अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीकडे रस्त्याची मागणी करूनही अद्याप रस्ता झाला नाही. घरकुलाचे ऑनलाइन फार्म भरूनही कुठल्याही प्रकारचे घरकुल देण्यात आलेले नाही. येथील ग्रामस्थांच्या शिधापत्रिका फाटल्या असून त्या त्वरित बदली करून मिळाव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.

कुर्णोली ग्रामपंचायतीचे ग्रामसेविका शासनाच्या विविध योजनांपासून वंचित ठेवणाऱ्या ग्रामसेविकाची चौकशी करून तातडीने सर्व सुविधा त्वरित उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा तहसील कार्यालयासमोर तेलमवाडीतील गोरगरीब आदिवासी उपोषणास बसू असा इशारा निवेदनावर देण्यात आला. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख बाळासाहेब धुमाळ आदिवासी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्याक्ष पांडुरंग शेंडे, कुर्णोलीच्या सरपंच वेणूबाई तेलम, वाळू तेलम, वत्सला गांगड, सोन्याबाई तेलम, ललिता आघान, अलका आघान, सखुबाई तेलम, भागाबाई आघान, भोराबाई गांगड, नारायण तेलम, कल्याबाई गांगड, लक्ष्मीबाई तेलम यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येत्या चार दिवसांत संबधित वाडीची पाणी योजना तातडीने राबवण्याच्या सूचना ग्रामसेविकेला दिल्या असून चार दिवसांत तेलमवाडीच्या ग्रामस्थांना पाणी उपलब्ध होईल. तसेच रस्त्याबद्दलही लवकरच मार्ग काढला जाईल.
– किरण जाधव, गटविकास अधिकारी, इगतपुरी

आपली प्रतिक्रिया द्या