१९ गावांतील ३३ वाड्यात टँकरने पाणी, संगमेश्वरात तीव्र पाणीटंचाई

सामना ऑनलाईन, संगमेश्वर

एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात संगमेश्वर तालुक्यातील १९ गावांतील ३३ वाड्यांमध्ये पाणीटंचाईची झळ बसली आहे. या सर्व गावांकडून पंचायत समितीकडे टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत पंचायत समिती २ शासकीय टँकरव्दारे ५ गावांतील ८ वाड्यांमध्ये एक दिवसआड पाणीपुरवठा सुरू आहे. आगामी काळात टँकरची संख्या वाढवली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

तालुक्यात यावर्षी १ एप्रिल रोजीच कातुर्डी कोंड गावासाठी पहिला टँकर रवाना झाला. त्यानंतर बेलारी माची धनगरवाडी, निवळी धनगरवाडी, शृंगारपूर कातुर्डी, पाचांबे, नेरदवाडी, दख्खीन टेप, शेनवडे, गवळीवाडी या ठिकाणीही टँकरने एक दिवसआड पाणीपुरवठा सुरू आहे.

तालुक्यातून १९ गावांतील ३३ वाड्यांमध्ये सध्या टंचाईची झळ बसली आहे. यामध्ये ओझरे खुर्द, कोंडओझरे बडदवाडी, निवळी धनगरवाडी, बेलारी खुर्द माची धनगरवाडी, शृंगारपूर कातुर्डी, पाचांबे नेरदवाडी, दख्खीण टेप, मेढे, ओझरे खुर्द, तळवडे मावळतीवाडी, उगवतीवाडी, मधलीवाडी, फुणगूस मुस्लिम मोहल्ला, तळेकांडे सांडीमवाडी, शेनवडे गवळीवाडी, दंड, राजीवली, कुटगिरी येडगेवाडी, कावीळटेप, काटवली घागवाडी, तळेवाडी, राईनवाडी, बौध्दवाडी, गुरववाडी, ढोसलवाडी, कोसुंब बौध्दवाडी, आंगवली सोनारवाडी, तुरळ हरेकरवाडी, कुळे धनगरवाडी, मधलीवाडी, माभळे गवळीवाडी, बौध्दवाडी, असुर्डे साखळकोंड, बौध्दवाडी, पुर्य तर्फे देवळे धनगरवाडी, गवळीवाडी, निगुडवाडी बौध्दवाडी यांचा समावेश आहे.

यातील पाच गावांतील ८ वाड्यांमध्ये टँकर सुरू आहे तर उर्वरित गावातील वाड्यांमध्ये पंचायत समिती आणि तहसीलदार प्रशासन संयुक्त पाहणी दौरा करून आवश्यकता असल्यास संबंधित गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येईल अशी माहिती प्रशासनाने दिली.

यावर्षी एप्रिलमध्ये तापमानाने कहर केला आहे. तालुक्यात गेले महिनाभर ३८ ते ३९ डिग्री तापमान आहे. वाढलेल्या उष्णतेचा परिणाम पाणवठ्यावर झाला असून नदी, नाले, ओढे, विहिरी सुक्या खडखडीत पडल्या आहेत. गेल्या २५ वर्षांतील सर्वाधिक कडक उन्हाचा अनुभव यावर्षी तालुकावासीय घेत आहेत. त्यामुळे आगामी काळात टंचाईग्रस्त गावांचे अर्धशतक होण्याची भीती व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या