महिनाभरापासून नगरमधील 9 गावांत ‘पाणीबाणी’, शिवसैनिकांनी रस्त्याचे काम बंद पाडले

नगर-सोलापूर रस्तेकामात खोदकाम केल्यामुळे बुऱहानगर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाइप तुटत आहेत. त्यामुळे नगरमधील वाकोडी, दरेवाडी, वाळुंज, शिराढोण, पारगाव, दहेगाव, साकत, वाटेफळ, रुईछत्तिसी या नऊ गावांना महिनाभरापासून पिण्याचे पाणी मिळालेले नाही. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱयांनी रस्त्याचे काम बंद पाडले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, दत्तात्रय खांदवे, अमोल तोडमल, सरपंच अमोल संपतराव तोडमल, ज्ञानेश्वर कोरडे, भाऊ बेरड, ग्रामपंचायत सदस्य दरेवाडी, जीएचव्ही कंपनीचे संपर्क अधिकारी अमोल बोबडे, दत्ता वाघ, उपसरपंच महेश म्हस्के उपस्थित होते.

नगर-सोलापूर रोडचे काम सुरू असल्याने बुऱहानगर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाइप तुटत आहेत. त्यामुळे वाकोडी, दरेवाडी, वाळुंज, शिराढोण, पारगाव, दहेगाव, साकत, वाटेफळ, रुईछत्तिसी या गावांना जवळपास महिनाभरापासून पिण्याचे पाणी मिळालेले नाही. याबाबत नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्य व लोकप्रतिनिधींसमोर नाराजी व्यक्त केली होती. त्याची दखल घेऊन संदेश कार्ले यांनी सहकाऱयांसह आज सोलापूर रोडचे काम बंद पाडले. नियमाप्रमाणे पिण्याच्या पाइपलाइनचे स्थलांतर करा, मगच रस्त्याचे काम करा, असा इशारा दिला. ऐन उन्हात शिवसैनिक आणि कंपनीच्या अधिकाऱयांमध्ये खडाजंगी सुरू होती. अखेर कंपनीच्या अधिकाऱयांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.