गोदावरी  कालव्याच्या आवर्तनाअभावी पिके धोक्यात

गोदावरी कालव्याच्या आवर्तनाअभावी लाभक्षेत्रातील हातातोंडाशी आलेली गहू, हरभरा, कांदा यांसारखी पिके धोक्यात आली आहेत. यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आणि धरणेही शंभर टक्के भरलेली आहेत. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. सध्याच्या वाढत्या तापमानामुळे भूजलपातळी घसरली असून, विहीर तसेच बोअरवेल कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. विजेचा लपंडाव चालू असल्याने जे काही थोडेफार पाणी आहे तेही पिकांना देता येत नाही. एका पाण्याअभावी रब्बी पीक हातचे जाईल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी शेतकऱयांकडून होत आहे.

गोदावरी कालव्यांच्या दोन आवर्तनांत जादा अंतर पडल्याने पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. यापूर्वीचे आवर्तन होऊन दोन महिने होत आले आहेत; परंतु अद्यापि आवर्तन सोडण्याबाबत अधिकृतपणे माहिती लाभधारकांना दिली जात नाही. मागणी कमी येण्याचे खरे कारण या अनिश्चिततेमध्येच दडलेले आहे. शेतकऱयांकडून विविध ठिकाणी गाऱहाणी मांडली जातात; परंतु त्याची गांभीर्याने दखल घेऊन लाभधारकांबरोबर संवाद साधून त्याबाबतची वस्तुस्थिती सांगावी, असे कुणालाच वाटत नाही. त्यामुळे प्रशासन बेफिकीर होत आहे. सोशल मीडियावर आज पाणी सुटणार उद्या पाणी सुटणार म्हणून लाभधारकांची दिशाभूल करण्यात येऊन त्यांना आशेला लावले जात आहे. सद्यस्थितीत गोदावरी कालवा कल्व्हर्टची कामे चालू असल्याने मार्चच्या आठ-नऊ तारखेपर्यंत कालव्यात पाणी येण्याची सुतराम शक्यता नाही, ही वस्तुस्थिती आहे.

दोन आवर्तनांतील तीन आठवडय़ांच्या बंद काळात ही कामे दोन शिफ्टमध्ये युद्धपातळीवर करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने करणे गरजेचे होते. यातून आवर्तन वेळेत सोडता आले असते; परंतु ठेकेदाराची असमर्थता आणि जलसंपदाची उदासीनता यामुळे तसे झाले नाही. त्यामुळे ऐन गरजेच्या वेळी आवर्तन मिळण्याची शक्यता दुरावली आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाच्या कचाटय़ात शेतकरी भरडला जात आहे. सध्या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. जलसंपदा विभागाने क्षेत्रीय परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून आवर्तन सोडण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी लाभधारकांकडून होत आहे.

जलसंपदा अधिकाऱयांचे दुर्लक्ष

दुर्दैवाची बाब म्हणजे लाभक्षेत्रातील परिस्थिती भीषण असूनही जलसंपदा अधिकाऱयांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. सध्या सिंचन व्यवस्थापनाच्या मूलभूत; परंतु साध्या साध्या किरकोळ विषयासाठी सातत्याने संघर्ष करावा लागत आहे. रस्त्यावर यायची वेळ येते, उपोषणास बसावे लागते. कालवा सल्लागार समितीची बैठक लाभक्षेत्राबाहेर झाल्याने त्या नियोजनात त्यांना सहभाग घेता आला नाही. कालवा सल्लागार बैठकीत ठरलेल्या नियोजनाप्रमाणे अंमलबजावणी झाली नाही.

गोदावरी कालव्याच्या कल्व्हर्टचे काम करताना अचूक पूर्व नियोजन आवश्यक आहे. पिकांना वेळेत पाणी मिळेल, अशा पद्धतीने दोन आवर्तनांच्या बंद कालावधीत ही कामे सुरू करून पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व साधनसामग्री तसेच मनुष्यबळ पूर्ण क्षमतेने अगोदरच तयार ठेवणे आवश्यक आहे. सदरचे काम युद्धपातळीवर दोन किंवा गरजेनुसार तीन शिफ्टमध्ये केले पाहिजे. दुर्दैवाने तसे नियोजन न झाल्याने पिकांना वेळेत पाणी देता येणे शक्य झाले नाही.

– उत्तमराव निर्मळ, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग.