‘टँकर’ वाड्याने शंभरी गाठली

26
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

यंदा मराठवाडा विभागात सरासरी ८४ टक्के पाऊस झाला. विभागातील चार जिल्ह्यांत समाधानकारक पाऊस झाला असला, तरीही इतर जिल्ह्यांना मात्र जानेवारी महिन्यातच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

संभाजीनगर, जालना आणि नांदेड जिल्ह्यांतील ८६ गावांमध्ये तब्बल १०० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. एक लाख ७५ हजार नागरिकांची तहान टँकरवर भागविली जात आहे. आगामी काही दिवसांत पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता अधिक आहे. संभाजीनगरपाठोपाठ नांदेड जिल्ह्याला पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या जिल्ह्यात ५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

सर्वाधिक टंचाईच्या झळा संभाजीनगर जिल्ह्याला बसत आहेत. जिल्ह्यामधील संभाजीनगर, गंगापूर, फुलंब्री, वैजापूर, रत्नपूर, कन्नड, सिल्लोड या ७ तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, जिल्ह्यातील ७८ गावांमधील तब्बल १ लाख ७५ हजार नागरिकांची तहान ८९ टँकरद्वारे भागविण्यात येत आहे.

संभाजीनगरसह परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी पाऊस झाला, त्यामुळे या जिल्ह्यांना उन्हाळ्याच्या प्रारंभीच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकर वाढविण्याचे अनेक प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे येत असल्यामुळे येणाऱ्या काळात टँकरसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. ही टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने टंचाई कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी विभागातील जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत.

जालना जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ९८ टक्के पाऊस झाला असला, तरी भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात टँकरपेâरा सुरू आहे. दोन्ही तालुक्यांतील चार गावांमधील १२ हजार नागरिकांची तहान ६ टँकरद्वारे भागविण्यात येत आहे. तर नांदेड जिल्ह्याच्या विविध भागांत ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

marathwada-chart

आपली प्रतिक्रिया द्या