शिवसेनेमुळे महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरून घराघरात पाणी आले!

54

सामना ऑनलाईन, मंडणगड

जनविकासाचा नुसता आभास निर्माण करून चालत नाही तर रयतेच्या विकासाचे स्वप्न पाहून ते पूर्ण करावे लागते आणि अशी स्वप्ने पाहण्याची व ती जनहितासाठी प्रत्यक्ष कार्यान्वित करण्याची स्वप्नवत दूरदृष्टी केवळ शिवसेनेकडेच आहे. त्यामुळेच शिवसेना आज खऱ्या अर्थाने कोकणात तग धरून आहे,असे सांगून कोकणातील गावागावातील महिलांचा डोक्यावरचा हंडा उतरून आज घराघरात नळपाणी योजनेद्वारे पाणी दिले जातेय.असे प्रतिपादन शिवसेना नेते राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात ‘शिवसेना आपल्या दारी’ उपक्रमातील कार्यक्रमाच्या जामगे येथील शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.

दापोली विधानसभा मतदारसंघात ‘शिवसेना आपल्या दारी’ हा गावभेट कार्यक्रम आजपासून दापोली तालूक्यातील जामगे या गावापासून सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाला रामदास कदम यांच्याबरोबरच शिवसेना युवासेना राज्य कोअर कमिटी सदस्य योगेश कदम, जि.प. अध्यक्षा स्वरूपा साळवी, उपाध्यक्ष संतोष थेराडे, बांधकाम आणि आरोग्य सभापती अण्णा कदम, समाजकल्याण सभापती चारुता कामतेकर आदी पदाधिकरी उपस्थित होते.

या वेळी रामदास कदम पुढे बोलताना म्हणाले की, आज कोणतीही निवडणूक समोर नसतानाही शिवसेना आपल्या दारी हा कार्यक्रम घेऊन गाव भेटीला आली आहे. शुभारंभाच्या वेळी जामगे गावातील आरोग्य उपकेंद्राचा प्रश्न त्याच जागी सोडविला तर येथील ऐतिहासिक असलेले तळे शुशोभीकरण करण्यासाठी लागेल तेवढा निधी देण्याचे वचनही या सभेत जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिले. तसेच नळपाणी योजनेसाठी लाभेल ते सहाय्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा उल्लेख केला. त्याचा धागा पकडून रामदास कदम म्हणाले की, १९९५ साली युती शासन असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने कोकणातील गावागावातील महिलांचा डोक्यावरचा हंडा उतरून आज घराघरात नळपाणी योजनेद्वारे पाणी दिले जातेय. सामाजिक बांधिलकीने जनहितासाठी शिवसेना नेहमीच तत्पर राहील, असे सांगितले. त्यामुळे शिवसेनेचा भगवा झंझावाद कायम या मतदारसंघात निर्माण करून शिवसेनेचा या मतदारसंघावरील खाली उतरलेला भगवा हा सन्मानाने आपण सारे जण परत फडकवूया, असे विनम्र आव्हान उपस्थितांना केले.

या कार्यक्रमाला शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, क्षेत्रप्रमुख संदीप राजपुरे, तालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे, भगवान घाडगे, मंडणगड सभापती आदेश केणे, विश्वास कदम, जि.प. सदस्य संतोष गोवळे, खेड सभापती भाग्यश्री बेळोसे, उपसभापती विजय कदम, स्थानिक सरपंच, बानू हवा अनंत वाजे, माजी जि.प. सदस्य राजेंद्र फणसे पवार, विलास जाधव, अरुण कदम आदी उपस्थित होते.

९.३० वाजता जामगे येथून सुरू झालेली ही गावभेट सातेरे, शिरसाडी, सोवेली, आवाशी, कुडावळे, नवानगर, गणपतीपुळे, टांगर, हातीप, सोंडेज्ञर, पालगड, शिरखळ, चिंचाळी आणि विसापूर या ठिकाणी मोठय़ा जल्लोषातील भगव्या उत्साहात संपन्न झाला.

विरोधकांचे धाबे दणाणले
शिवसेना केवळ राजकीय संधीसाधूपणासाठी गावभेटीला आली नसून गावागावातील विकासाचे प्रश्न हे सोडविण्यासाठीच शिवसेनेने हा उपक्रम हाती घेतला आहे. सहाजिकच गावागावातील सर्वपक्षीय ग्रामस्थांची उपस्थिती पाहून विरोधकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे विरोधक हे शिवसेनेवर टीका करत राहणार आहेत. मात्र जनतेने या टीकेकडे लक्ष न देता आपल्या विकासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन रामदास कदम यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या