सुशिल बहुमंडळाने उपलब्ध करुन दिला उमलातांडा गावाला मोफत पाणी टँकर

सामना प्रतिनिधी । नांदेड

लोहा तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने वाडी-तांड्यावर ग्रामस्थांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जैन समाजाच्या सुशिल बहुमंडळाने उमलातांडा येथे मोफत पाणी टँकर व पाणीपुरवठा उपलब्ध करुन दिला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. अनेक किलोमीटरवर जावून वाडी,तांड्यावरच्या ग्रामस्थांना पाणी आणावे लागत आहे. याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दुष्काळ विमोचन समितीच्या मार्गदर्शनाखाली जैन समाजाच्या सुशिल बहुमंडळाने उमलातांडा ता. लोहा या तांड्यासाठी येत्या १५ जूनपर्यंत मोफत पाणी टँकर देण्याची योजना आखली होती. त्याचा आज शुभारंभ झाला.

उमलातांडा या गावाला पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. हे लक्षात घेवून समाजाने समाजासाठी समाजाव्दारे अशा उपक्रमाचे पुढाकार घेवून आयोजन करणे व तांड्यावरील जनतेचे आशिर्वाद घेणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. विशेष म्हणजे मुक्या जनावरांसाठी देखील पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उमलातांडा येथे जावून तेथील गावकऱ्यांना विशेष करुन महिलांना या उपक्रमाची माहिती दिली. येत्या १५ जूनपर्यंत हा पाणीपुरवठा नित्यनियमाने सुरु राहणार आहे. आज त्याचे विधीवत पाणी टँकरचे जलपूजन करुन त्याचा शुभारंभ केला. गावकऱ्यांना या उपक्रमाचे कौतुक केले असून, सुशिल बहुमंडळाचे आभार मानले आहे. या प्रसंगी सुशिल बहुमंडळाच्या अध्यक्षा वैशाली बाफना, सचिव राखी पोकर्णा, कोषाध्यक्ष निलिमा मुनोत, सुमिता भंडारी, प्रेमा पोकर्णा, सुमन दर्डा, सुनिता दर्डा, किर्ती बाफना, जयश्री धोका, ममता कोठारी, किर्ती धोका, शांता काबरा आदी तांड्यावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संपर्कप्रमुख इंद्रजित बैस, दुष्काळ विमोचन समितीचे प्रमुख दिपक मोरताळे, दिपक सुराणा आदींनीही परिश्रम घेतले.