सांगलीतील शामरावनगरमध्ये साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटला, आयुक्त, नगरसेवकांच्या मध्यस्तीने नाला केला खुला

गेल्या कित्येक दिवसांपासून पाण्याच्या वेढय़ात असलेल्या शामरावनगरमधील साचून राहणाऱ्या पाण्याचा प्रश्न अखेर निकाली निघाला. महापालिका आयुक्त सुनील पवार, उपआयुक्त राहुल रोकडे यांच्या नियोजनामुळे आणि नगरसेवक अभिजित भोसले यांच्या प्रयत्नामुळे शामरावनगरमधील नाला अंकलीच्या बाजूला खुला करण्यात आला आहे. त्यामुळे शामरावनगर परिसरामध्ये साचून राहणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात झाली.

स्वराज्य चौकापासून धामणीच्या बाजूने हा नाला जातो. यापूर्वी हा नाला शेतकऱ्यांनी अडवल्यामुळे थांबला होता. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी साचून राहत होते. नगरसेवक अभिजित भोसले, नगरसेविका नसीमा नाईक, सामाजिक कार्यकर्ते रजाक नाईक यांनी पुढाकार घेत आयुक्त सुनील पवार आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या सूचनेनुसार शेतमालकांशी बोलणी करून आणि संभाव्य डीपी आरक्षण लक्षात घेता शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नाला पुढे वळवून अंकलीच्या नाल्याला जोडण्यात आला.

महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या उपस्थितीत शामरावनगर ते अंकलीकडे जाणाऱ्या नाल्यामध्ये पाणी प्रवाहित करण्यात आले. नाला प्रवाहित झाल्याने पाणी वेगाने बाहेर पडले. त्यामुळे शामरावनगरमध्ये साचून राहणाऱ्या पाण्याचा प्रश्न आता संपला आहे. त्यामुळे गेले अनेक वर्षे शामरावनगरमध्ये साचून राहिलेल्या पाण्याचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. याबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी जलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता कुरणे, शाखा अभियंता महेश मदने, कोमल कुदळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.