भिगवणसह सात गावांच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा बंद

55

सामना ऑनलाईन । भिगवण

वीज बील थकवल्याने भिगवण शहरासह सात गावांच्या पाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा महावितरणने खंडीत केलाय. यामुळे ऐन सनासुदीच्या काळात नागरिकांवर पाण्याचे संकट ओढवले आहे. पूर्वीच्या ग्रामपंचायतीने हे बिल थकविल्याने ही नामुष्की ओढवल्याचं सांगितलं जात आहे. वीज पुरवठा पूर्ववत करावा अन्यथा वीजवितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे. वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार वीज पुरवठा खंडीत करण्याच्या सूचना भिगवण शाखेला देण्यात आल्या आहेत.

पाणी पुरवठा होत नसल्याने इथल्या नागरिकांना टँकरने पाणी मागवावं लागतंय. पाण्यासाठीचा कर देऊनही ही वेळ आल्याने हे नागरीक प्रचंड संतापले आहेत. ग्रामपंचायतीमध्ये दीड वर्षांपूर्वी सत्ता परिवर्तन झालं. तेव्हापासून आजपर्यंत पाणीपुरवठा योजनेसाठीच्या वीजपुरवठ्याचं बिल कधीही थकलं नसल्याचं सध्याचे सत्ताधारी सांगत आहेत. मात्र आधीच्या ग्रामपंचायतीने बिल भरल्याने ३० लाख रूपयांची थकबाकी ग्रामपंचायतीवर आहे. ही थकबाकी शासनाने माफ करावी किंवा आमचे विजेचे बिल भरावे अशी मागणी उपसरपंच प्रदीप वाकसे यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या