निसर्गाच्या भयंकर प्रकोपाने भूस्खलनाने केरळच्या वायनाडमध्ये हाहा:कार उडाला आहे. केरळच्या वायनाडमधील तीन गावांमध्ये 256 हून अधिक नागरिकांचा बळी गेला. तर अनेक जण बेपत्ता आहेत. या निर्सगाच्या भीषण प्रकोपाबाबत भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोने चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी केलेल्या सर्व्हेत वायनाडच्या सगळ्यात मोठ्या भागावर भूस्खनाचा परिणाम झाला आहे. भूस्खलनाने एवढ्या मोठ्या भागावर परिणा झाला आहे की त्यावर 13 आंतरराष्ट्रीय फुटबॉल मैदानं बांधली गेली असती. भूस्खलनामुळे एवढा मोठा भाग इरुवाझिंझी नदीत सामावला गेला आहे.
इस्त्रोने गुरुवारी भूस्खलन परिसराचा एरियल सर्व्हे केला. या सर्व्हेत सॅटेलाईट डेटा पाहता भूस्खलन परिसरात 86 हजार वर्गमीटर परिसराचे ढिगाऱ्यात रुपांतर झाले. फीफा वर्ल्ड कपच्या नियमानुसार आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या स्पर्धेसाठी फुटबॉल मैदान 6 हजार 400 वर्गमीटर असणे गरजेचे असते. त्या नियमाप्रमाणे इथे 13 हून अधिक मैदाने बनवली जाऊ शकतात. बुधवारी 31 जुलै रोजी इस्त्रोने RISAT-2B सॅटेलाईट द्वारा काढलेल्या इस्त्रोच्या फोटोनुसार भूस्खलनामुळे झालेला चिखल, मोठे दगड आणि पडलेल्या झाडांबरोबर 8 किमी परिसरापर्यंत हा ढिगारा वाहत गेला आणि अखेर चेलियार नदीच्या उपनदीमध्ये सगळा पडला. चिखलाच्या अजस्त्र लोंढ्याबरोबर प्रचंड वेगाने नदीचा प्रवाह रुंदावला आणि तिचा किनारा फुटला, असे इस्त्रोने म्हटले आहे.
ज्यांनी या निसर्ग प्रकोपाचा अनुभव घेतला ते आताही या भयंकर घटनेतून सावरलेले नाहीत. त्यांनी या ढिगाऱ्याला मातीची भिंत म्हटले असून त्यामुळे शेकडो घरे गाडली गेल्याचे सांगितले. आहे. या आपत्तीच्या केंद्रस्थानी इरुवाझिंझी नदी आहे, जी मुंडक्काईपासून सुमारे 3 किमी वरच्या टेकड्यांमध्ये उगम पावते. समुद्रसपाटीपासून सुमारे 1500 मीटर उंचीवर भूस्खलन झाल्याचे इस्रोने सांगितले. विथिरीमध्ये 48 तासांत सुमारे 57 सेंटीमीटर पाऊस झाला. आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.