आपणच जतन करूया इतिहासाचा ठेवा !

2223

 

 

श्रीकांत उंडाळकर

सह्याद्रीचा कणखरपणा, रौद्र सौंदर्य, तेथील भूगोल आणि इतिहास हा प्रत्यक्ष जाऊनच अनुभवावा लागतो. सध्या आपल्या गड-किल्ल्यांची अवस्था खूपच वाईट आहे. यात अनेक ठिकाणची बुरुज, सदर, मंदिरे, गडावरील वास्तू अशी अनेक बांधकामे ढासळत चालली आहेत. किंबहुना काही ठिकाणी तर पूर्णपणे जमीनदोस्त झालेली आहेत. कित्येक किल्ल्यांवरील दगडांवर, भिंतीवर, तोफांवर काही कृतघ्न लोकांनी स्वतःची आणि त्यांच्या आवडत्या व्यक्तींची नावे लिहिली आहेत, रंगवली आहेत. ज्या वीरांनी आपले रक्त त्या गड-किल्ल्यांवर सांडले त्यांना कधीच वाटले नव्हते की आपलेही नाव या अशा गड किल्ल्यांवर कुठेतरी लिहिलेले असावे. मात्र ही गोष्ट अशा महाभागांना कधीच समजणार नाही.

सध्या अनेक किल्ल्यांवर दारू पिणे, सिगारेट ओढणे, गुटखा-तंबाखू खाऊन पचापच थुंकणे हे नित्याचेच झाले आहे. दारू पिऊन त्याच्या बाटल्या, शीतपेयांचे डबे डोंगरावर बिनधास्तपणे फेकून देताना एकाही माणसाला असे वाटत नाही की, ज्या ठिकाणी आपल्याच मावळ्यांचे रक्त सांडले आहे, तेथेच आपण अशी घाण करीत आहोत.

अनेक किल्ल्यांवर तर आता प्रेमीयुगुलेही बिनधास्तपणे ‘प्रेम’ (?) करताना दिसतात. सध्या हे गड-किल्ले म्हणजे ऐतिहासिक आणि पवित्र जागा नसून विरंगुळा, पिकनिक, प्रेमं करायचे हक्काचे ठिकाण झालेले आहे, असेच लोकांना वाटायला लागले आहे. हे कोठेतरी थांबायला हवे.

जेव्हा लोकं येथे भेटी देण्यासाठी येतात तेंव्हा त्यांच्यासोबत वेफर्स, चॉकलेट्स, कुरकुरे, फ्रुटी अशा अनेकविध खाद्य पदार्थांचा मेनूच असतो. मात्र हे खाऊन झाल्यावर त्यांना असे समजत नाही की त्याचे वेष्टन हे परत घरी घेऊन जायचे असते. त्यामुळे वरीलप्रमाणे अनेकविध खाद्यपदार्थांच्या कचऱयाची विल्हेवाट लागत नाही आणि ते वर्षानुवर्षे त्या गड-किल्ल्यांवरच वास्तव्य करून असतात. अशाने संपूर्ण डोंगराची अवस्था वाईट झालेली दिसून येते.

शिरगाव, संग्रामदुर्ग, दमण, माहीम, शिवडी, घोडबंदर अशांसारखे अनेक भुईकोट किल्ले तर गर्दुल्यांचे माहेरघरच तर बनले आहेत. तसेच फुकटचे सुलभ शौचालय म्हणूनही अनेकजण याचा वापर करताना दिसतात, इतकी दारुण अवस्था आहे सध्या.

यातच बऱयाच किल्ल्यांवर सध्या जेवण मिळते. यात भाजी, पिठलं, भाकरी, दही, ताक अशापुरतीच मर्यादा असती तर बरं झालं असतं. मात्र त्याची जागा आता अंडी, गावरान कोंबडी यांनी घेतली आहे, तर काही ठिकाणी चक्क चायनीजही करून द्यायची सोय केलेली आहे. अशा या गोष्टींमुळे गडावर खाण्या-पिणाऱयांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. किंबहुना सध्या ही फॅशन (?) झालेली आहे. अनेक ठिकाणी लिंबू सरबत, कोकम सरबत, ताक, दही अशासारखी पेये मिळतात. मात्र ते प्लास्टिकच्या ग्लासमधून देऊ केले जाते. अशा मुळे सर्वत्र कचरा होत आहे. या साठी तुम्ही आम्ही सर्वच जबाबदार आहोत. मात्र स्वतःहून पुढाकार घेऊन आपल्या गड-किल्ल्यांचे जतन करावे, यासाठी एकजुटीने सर्वानी पुढे यायला हवे.

गड-किल्ले संवर्धनासाठी महाराष्ट्रातील अनेक इतिहास आणि दुर्ग प्रेमी संस्था आपापल्या परिने कामं करीत आहेत. यामध्ये संपूर्ण गडावरील प्लास्टिक, कागद, बाटल्या या वस्तू निवडून निवडून त्या कचऱयाची साफसफाई करीत आहेत. अनेक संस्थांनी विविध किल्ले दत्तक घेतले आहेत. म्हणजे तेथील साफसफाईची करणे, स्वच्छता राखणे, तेथे माहिती फलक लावणे, तेथील पाण्याचं टाकी, विहिरी, तळी साफ करणे अशा सारख्या गोष्टींची जबाबदारी त्यांनी स्वतःहून घेतलेली असते. आता फक्त एवढेच करून चालणार नाही तर यापुढे आपण अशा ठिकाणी फिरायला जाताना फळांच्या-झाडांच्या बिया घेऊन त्या थोडय़ा थोडय़ा अंतराने पसरवत जायला हव्यात. जेणेकरून तिकडे आपोआपच जंगल निर्माण होईल आणि सर्वत्र हिरवेगार होईल.

अनेक ठिकाणी किल्ल्यांवर कुठली तरी तद्दन फालतू गाणी लावणे आणि त्यावर बिभत्स नृत्य करणे असले घाणेरडे प्रकार चालतात, ते त्यांना टाळायला सांगितले पाहिजे. या ऐतिहासिक स्थळांना इतिहासकारां सोबत भेट देणे, किल्ल्यां सभोवती भरपूर झाडे लावणे आणि त्यांचे जतन करणे, शस्त्रास्त्रांचे आणि गड-किल्ल्यांच्या फोटोंचे वा प्रतिकृतींचे प्रदर्शन भरवणे, गड-किल्ल्यां सभोवती असणाऱया गावागावां मध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवून तेथील स्थानिक लोकांना त्यात सामावून घेणे कि जेणे करून त्यांना देखील त्या किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्व समजेल आणि त्यातून रोजगार संधी उपलब्ध होतील आणि त्यामुळे आपसूकच अशा ठिकाणांची जपणूक होईल.

असे कार्यक्रम फक्त सणवारांना न ठेवता संपूर्ण वर्ष भर राबवण्यात यायला हवेत. यामुळे भेट देणाऱयांना फक्त इतिहास आणि भूगोलच कळायला मदत होणार नाही तर यामध्ये जंगल वाचन, विविध प्रकारचे पक्षी-प्राणी, फुलपाखरे, पाने-फुले, विविध वनस्पती तसेच रात्री आकाशात दिसणारे असंख्य तारे अशासारख्याचाही एक वेगळा आणि सुंदर अनुभव घेता येतो. यामधूनही करिअरच्या संधी उपलब्ध होतील.

 

आपली प्रतिक्रिया द्या