मुंबईत भाजपचा महापौर नकोच!

सामना ऑनलाईन,नांदेड

मुंबईत भाजपचा महापौर व्हावा अशी आमची अजिबात इच्छा नाही, असे सांगतानाच मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादीचा पाठिंबा कोणाला द्यायचा की नाही याचा निर्णय पक्षाचे स्थानिक पदाधिकारी घेतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे सांगितले. भाजपला पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी याआधीच स्पष्ट केले होते.

ते पुढे म्हणाले की, शिवसेनेला फार कमी मतांची गरज आहे. काही अपक्ष त्यांनी मिळवलेही आहेत. आणखी काही मिळवतील. मुंबईच्या बाबतीत काँग्रेसचे धोरण काय आहे ते माहीत नाही, पण मुंबईत राष्ट्रवादीचा पाठिंबा कोणाला द्यायचा की नाही याचा निर्णय आमचे स्थानिक पदाधिकारी घेतील.

विधानसभेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे संख्याबळ पाहता राज्यात आम्ही सरकार स्थापन करू शकत नाही. तसेच आम्ही शिवसेना किंवा भाजपलाही पाठिंबा देऊ शकत नाही. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाण्याशिवाय कोणताच पर्याय नाही असे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘आम्ही मध्यावधी निवडणुकीला सज्ज आहोत’ असे आज येथे जाहीर केले.

मुंबईत भाजपचे ८२, शिवसेनेचे ८४ उमेदवार निवडून आले आहेत तर ४ अपक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ८८ झाले आहे. काँग्रेसचे ३१ उमेदवार विजयी झालेले असून राष्ट्रवादीचे ९ उमेदवार निवडून आलेले आहेत.

काँग्रेससोबत आघाडी करून 18 जिल्हा परिषदांमध्ये सत्ता

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडी झाली तर १८ जिल्हा परिषदांमध्ये आमची सत्ता येऊ शकते. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात चर्चाही झाली आहे. मुंबईत होणाऱया बैठकीत याबाबतचा निर्णय होऊ शकतो, असे शरद पवार यांनी सांगितले. जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी यांना मिळालेली मते पाहता स्वबळावर काँग्रेस एक तर राष्ट्रवादी  तीन जिल्हा परिषदांमध्ये सत्तेवर येईल असे सांगून ते पुढे म्हणाले की, १ ते ३ जिल्हा परिषदांची सत्ता मिळवायची की १७-१८ याचा निर्णय आता दोन्ही पक्षांना घ्यावा लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या