तुगलकाबादमधील मंदिर पाडण्यात आमचा हात नाही, केजरीवाल यांचे स्पष्टीकरण

812

सामना ऑनलाईन । मुंबई

राजधानी दिल्लीतील तुगलकाबादमध्ये असलेले संत रविदास मंदीर पाडण्याच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू झाले आहे. बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी बुधवारी सकाळी दिल्ली आणि केंद्र सरकारवर ट्वीटद्वारे हल्लाबोल केला होता. आता या टीकेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दिले आहे. दिल्लीमधील जमीन केंद्राच्या हाती आहे, त्यामुळे मंदिर पाडण्यात आमचा हात नसल्याचा खुलासा केजरीवाल यांनी ट्विटरवर केला आहे.

मायावती यांच्या आरोपांना उत्तर देताना अरविंद केजरीवाल ट्विटरवर म्हणतात की, ‘मंदिर पाडल्याच्या वृत्तामुळे आम्ही सर्वच दु:खी झालो आहोत. आमचा याला तीव्र विरोध आहे. केंद्रासोबत तुम्ही आम्हालाही दोषी मानता ही खेदाची बाब आहे. दिल्लीची जमीन केंद्र सरकारच्या हातात आहे. मंदिर पाडण्यामध्ये आमचा कोणताही हात नाही’, असे ट्वीट केजरीवाल यांनी केले आहे.

नक्की काय आहे प्रकार

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्ली विकास निगमने तुगलकाबादमधील संत रविदास मंदिर पाडले. त्यावर दलित समाज नाराज झाला त्याचा परिणाम दिल्लीसह पंजाबमध्येही पाहायला मिळाला. पंजाबमधील काही शहरांमध्ये बुधवारी दलित समाजाने बंद पुकारला. त्यामध्ये जालंधर, गुरदासपुर आणि होशियारपुर सारखी शहरे होती. बऱ्याच ठिकाणी या घटनेचा विरोधार्थ आंदोलने,मोर्चा काढण्यात आले. त्याला आवर घालण्यासाठी पोलिसांना हवेत गोळ्या झाडाव्या लागल्या.

मायावतींचे आरोप

तुगलकाबादमधील संत रविदास मंदिर पाडण्यावरून मायावती यांनी दिल्ली आणि केंद्र सरकारला धारेवर धरले. केंद्र आणि दिल्ली सरकार यांनी मिळून संत रविदास मंदीर पाडले. याचा मी विरोध करते, असे ट्वीट मायावती यांनी केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या