न्यायासाठी भांडावं लागेल, झगडावं लागेल; मुस्लिम व्यक्तीला मारहाण करणाऱ्या आरोपींचा जामीन रद्द झाल्यावर आव्हाडांची प्रतिक्रिया

धुळे-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोमांस नेण्याच्या संशयावरून तीन तरुणांनी एका 72 वर्षांच्या वृद्धाला माराहण केली होती. त्यांची जामीनावर सुटका झाली होती. पण नव्याने कलम लागल्याने या तरुणांचा जामीन रद्द झाला आहे. न्यायासाठी भांडावं लागेल झगडावं लागेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. तसेच पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे हे तरुण सुटले होते पण आज पोलिसांनी काळजीपूर्वक कलमे वाढवली आणि त्यांचा जामीन रद्द झाला असेही आव्हाड म्हणाले.

एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करून जितेंद्र आव्हाड म्हणाले की, धुळे एक्स्प्रेसमध्ये अश्रफ अली सय्यद हुसैन या ७२ वर्षीय वृद्धाला केलेल्या मारहाण प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी योग्य ती कलमे न लावल्यामुळे मारहाण करणाऱ्यांची तेवढ्याच लवकर सुटका झाली होती. या प्रकरणात पोलिसांची भेट घेऊन त्यांना शांतपणे समजवून सांगितल्यानंतर पोलिसांनी BNS 302 आणि BNS 311 ही दोन कलमे अधिकची दाखल केली. त्यामुळे आज न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द केला असे आव्हाड म्हणाले.

तसेच तुम्हाला न्यायासाठी भांडावे लागेल… झगडावे लागेल ! जात, पात, पंथ, प्रांत न बघता भारतीय संविधानाने सांगितल्याप्रमाणे न्याय सर्वांसाठी समान आहे, समजून – उमजून आपणाला लढा द्यावा लागेल. जर राजकारण्यांनीच ठरविले की आपण शांत बसायचे तर हा देश अशांत होईल. ज्याने केलंय , त्याला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. दोन कलमे अधिकची लावली म्हणून वृद्ध माणसाला मारहाण करणारी तीन पोरं पुन्हा जेलमध्ये गेली. ती आधीच जायला हवी होती. पण, पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे ते काल सुटले होते. आज पोलिसांनी काळजीपूर्वक कलमे वाढविली अन् आज ते जेलमध्ये गेले असेही आव्हाड म्हणाले.