माझी आणि हरमनप्रीत कौरची तुलना नाही – कपिल देव

27

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार हरमनप्रीत कौरने महिला विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध नाबाद १७१ धावांची दणदणीत खेळी केली. या खेळीसाठी क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी हरमनप्रीतच्या खेळीची तुलना १९८३ च्या विश्वचषकातील कपिल देव यांच्या १७५ धावांच्या खेळीशी केली आहे. मात्र कपिल यांनी दोन्ही खेळींची तुलना होऊ शकत नाही असे एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

प्रत्येक खेळीचे वेगळे महत्त्व असते त्यामुळे दोन खेळींची तुलना करणे योग्य होणार नाही. प्रत्येक खेळाडूसाठी देशाकरिता अशी खेळी करणे ही बहुमानाची बाब असल्याचे कपिल म्हणाले.

‘हरमनप्रीत कौरच्या खेळीची चर्चा पुरूषांच्या खेळी इतकी होत नाही, मात्र ती नक्कीच खास आहे. असे वाटत आहे की हिंदुस्थानने विश्वचषक जिंकला आहे, मात्र अंतिम सामना अजून बाकी आहे. अंतिम सामना यजमान इंग्लंडसोबत होणार आहे. या सामन्यासाठी मी हिंदुस्थानच्या संघाला शुभेच्छा देतो’, असे कपिल देव म्हणाले.

१९८३ च्या वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात कपिल देव फलंदाजीसाठी उतरले होते तेव्हा हिंदुस्थानने १७ धावांवर ५ विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर कपिल देव यांनी १७५ धावांची खेळी करत हिंदुस्थानला विजय मिळवून दिला होता. क्रिकेट विश्वातील त्या खेळीचा अनेक दिग्गजांनी सर्वोत्तम खेळी असा उल्लेख केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या