हैदराबाद गँगरेप एन्काउंटर – काय घडले त्या 30 मिनिटांत… वाचा सविस्तर

4877

हैदराबादमधील डॉ. तरुणीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपी शुक्रवारी पहाटे पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरमध्ये ठार झाले. 5.45 ते 6.15 या वेळेत झालेल्या एन्काऊंटरमध्ये 30 मिनिटात नेमके काय झाले, याची माहिती पोलीस आयुक्त व्ही.सी. सज्जनार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. बलात्काराच्या घटनेचे नाट्यरुपांतरण करण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी पहाटे आरोपींना घटनास्थळी नेले होते. त्यावेळी आरोपींनी पोलिसांची शस्त्रे हिसकावून गोळीबार करत पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना इशारा देत शरणागती पत्करण्याचे आवाहन केले. मात्र, आरोपींनी गोळीबार सुरू ठेवत दगड आणि काठ्यांनी पोलिसांवर हल्ला चढवला. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत चारही आरोपी ठार झाले आहेत.तर आरोपींच्या गोळीबारात दोन पोलीस जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. याबाबत मानवाधिकार आयोग आणि इतर संघटनांना योग्य ती उत्तरे देण्यात येतील असेही सज्जनार यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणाचा तातडीने तपास करत मोहम्मद आरीफ, नवीन, शिवा आणि चन्नकेशवुलू या चार आरोपींना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. 4 आणि 5 डिसेंबरला त्यांची कसून चोकशी करण्यात आली. शुक्रवारी पहाटे घटनेचे विविध पैलूंचा तपास करून प्रकरणाला गती देण्याच्या हेतूने घटनेच्या नाट्यरुपांतरासाठी पोलीस आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले होते. त्यावेळी आरिफ आणि चन्नकेशवलु यांनी पोलिसांची शस्त्रे हिसकावली आणि पोलिसांवर गोळीबार करत पळ काढण्याचा प्रयत्न केला. या गोळीबारात दोन पोलिस जखमी झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना इशारा देत शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, आरोपींनी गोळीबार सुरुच ठेवल्याने पोलिसांना प्रत्युत्तरादाखल कारवाई करावी लागली. त्यात चारही आरोपी ठार झाल्याचे सज्जनार यांनी सांगितले. पोलिसांनी आरोपींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.तसेच घटनास्थळाहून त्यांच्याकडील शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.

या एन्कारऊंटरबाबत मानवाधिकार आयोग आणि इतर संघटनांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या घटनेत नाइलाजास्तव पोलिसांना कारवाई करावी लागली आहे. या अर्ध्या तासात जे घडले, त्याची माहिती आम्ही दिली आहे. त्याचप्रमाणे या संस्थ्याच्या प्रश्नांनाही योग्य ती उत्तरे देण्यात येतील असेही सज्जनार यांनी स्पष्ट केले. आरोपींनी पोलिसांची शस्त्रे हिसकावल्याच्या वृत्ताला शमसाबादचे पोलीस उपायुक्त प्रकाश रेड्डी यांनी दुजोरा दिला आहे. तसेच एन्कारऊंटरनंतर जारी करण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये आरोपीच्या हातात पिस्तूल दिसत आहे. ही घटना गंभीर असून सोशल मिडीया आणि इतर माध्यमांतून पीडितेबाबत माहिती देण्यात येऊ नये, तिची ओळख आणि सन्मान जपावा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या