भंपकपणाविरोधात लढतच राहणार! उद्धव ठाकरे यांचा इशारा

सामना ऑनलाईन, मुंबई

सध्या पारदर्शकतेच्या नावाने सर्वत्र भंपकपणा सुरू आहे. कोणी पारदर्शक कारभाराची शपथ घेतोय तर कोणी पालिकेत पहारेकरी म्हणून काम करण्याची भाषा करत आहे. पण हा सगळा भंपकपणा असून तो फार काळ चालणार नाही. त्याविरोधात आपण लढतच राहणार, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि उपमहापौर हेमांगी वरळीकर यांच्यासह संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ातील हुतात्म्यांना अभिवादन केले त्यावेळी उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भाजपच्या नगरसेवकांनी आज सभागृहात पारदर्शक कारभाराची शपथ घेतली. याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारले असता, हा सारा भंपकपणा असल्याचे त्यांनी सांगितले.

पारदर्शकता  नुसती पालिकेच्या कारभारातच नको तर कॅबिनेटमध्येही पारदर्शकता हवी. कॅबिनेट मीटिंगला पत्रकार, विरोधी पक्षनेत्यांनाही परवानगी द्यायला हवी, तसेच आमदारांनीही पारदर्शक कारभाराची शपथ घ्यायला हवी असे उद्धव ठाकरे यांनी बजावले. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे यांनीही हुतात्म्यांना अभिवादन केले. याप्रसंगी पर्यावरणमंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱहे, उपनेते यशवंत जाधव, माजी महापौर स्नेहल आंबेकर, शिवसेना सचिव आदेश बांदेकर आदी उपस्थित होते.

सरकारचे अभिनंदन!

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यात स्मारक उभारण्याबाबतचे विधेयक सरकारने एकमताने मंजूर केले आहे त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी सरकारचे अभिनंदन केले.

शिवसेनेची भव्य रॅली

महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीनंतर सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेने महापालिका कार्यालयापासून हुतात्मा स्मारकापर्यंत भव्य रॅली काढली. यावेळी भगवे फेटे, भगवी उपरणी घातलेले शिवसैनिक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

जनतेच्या रेटय़ामुळेच भाजपने शिवसेनेला मतदान केले!

भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान केले आहे. याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईकरांनी शिवसेनेवर मोठा विश्वास टाकून सर्वाधिक नगरसेवक निवडून दिले आहेत. जनतेचा हा मोठा रेटा शिवसेनेच्या बाजूने आहे. या रेटय़ाचीच दखल घेऊन त्यांनी शिवसेनेला मतदान केल्याचे ठाकरे यांनी सांगितले. तसेच ज्या ज्ञात-अज्ञातांनी सहकार्य केले त्यांचेही त्यांनी आभार मानले.

हुतात्म्यांचे बलिदान विसरणार नाही!

संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे ते शिवसेना कधीही विसरणार नाही. त्यांनी आपले रक्त सांडून मुंबई मिळवली आहे. म्हणूनच शिवसेना नेहमी नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांसह त्यांना अभिवादन करते असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.