तीन महिने थांबा, मोहन भागवतांना तुरुंगात टाकणार; आंबेडकरांचा इशारा

59

सामना प्रतिनिधी । नागपूर

‘सत्तेसाठी प्रत्येकाचे वेगवेगळे खेळ सुरू आहेत. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचेही वेगळे खेळ सुरू आहेत. पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात माझे नाव गोवण्यात आले. तीन महिने थांबा, पुढील निवडणुकीत भाजपला चारवर आणल्याशिवाय राहाणार नाही’, असे सांगतानाच सरसंघचालक मोहन भागवत यांना नागपूरच्या तुरुंगात टाकण्याचा जाहीर इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर येथील जाहीर सभेत दिला.

prakash-ambedkar

नागपूर येथे गुरुवारी एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघातर्फे वंचित बहुजन आघाडीचे ‘अर्थव्यवस्था अधिवेशन’ घेण्यात आले. यावेळी आंबेडकर यांनी सरकारवर सडकून टीका केली. उर्जित पटेल यांच्या जागी आलेले आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास हे इतिहासाचे पदवीधर आहेत. अर्थशास्रातील तज्ज्ञाऐवजी इतिहासातील पदवीधर आणून यांना रिझर्व्ह बँक इतिहासजमा करायची आहे काय, असा सवाल आंबेडकर यांनी केला.

प्रकाश आंबेडकर चालतील, पण ओवेसी नाही
राज्यात काँग्रेसही खेळ खेळत आहे. प्रकाश आंबेडकर चालतील. पण, ओवेसी चालणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जाहीररित्या सांगितले आहे. पण ओवेसींना सोडून काँग्रेससोबत कदापि युती होणार नाही, असे आंबेडकर यांनी ठणकावून सांगितले. काँग्रेसला आंबेडकर चालतात. मग ओवेसी का चालत नाही, असा सवाल आंबेडकर यांनी केला. मुळात अशोक चव्हाण यांना आमच्याशी बोलण्याचे अधिकार केंद्रीय नेतृत्वाने दिले आहेत काय, असा सवालही त्यांनी केला. आतापर्यत पाच बैठका झाल्या. पण अजूनही केंद्रीय नेतृत्वाकडून चर्चेचा निरोप आला नाही, असे आंबेडकर म्हणाले. सभेचे प्रमुख आकर्षण असलेले असदुद्दीन ओवेसी न आल्यामुळे उपस्थितांची निराशा झाली.

शेवट मात्र मी करणार…
काँग्रेसची एक तर भाजपाची दुसरी तऱ्हा आहे. तीन राज्यात भाजपा हरली म्हणून त्यांची लढाई संपलेली नाही. ते आता नवीन खेळ खेळायला सुरूवात करतील. पण आम्ही सावध आहोत. त्यांचे सैन्य असले तरी मी मात्र एकटाच आहे. ही लढाई संघ-मोहन भागवतांनी सुरू केली. शेवट मात्र मी करणार आहे, असा गर्भीत इशारा आंबेडकर यांनी भाजपाला दिला. यावेळी आंबेडकर यांनी मोहन भागवतांवर खरमरीत टीका केली.

करकरेंच्या शवविच्छेदनाचा अहवाल माझ्याजवळ
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी हेमंत करकरेंना गोळ्या कोणी घातल्या असा सवाल करतानाच करकरेंच्या शवविच्छेदनाचा अहवाल आपल्याजवळ आला आहे. लवकरच त्याविषयी बोलेन असे आंबेडकर म्हणाले. गुजरात दंगलीत आरएसएसचा स्वयंसेवक हिरेन पंड्याच्या पार्श्वभागावर गोळी लागली. मात्र त्याचा मृतदेह मारूती कारमध्ये सापडला. आता एखाद्याच्या पार्श्वभागावर गोळी मारायची झाल्यास त्याला आधी गाडीत पालथे पाडून गोळी घालावी लागेल. मग पंड्याला मारले कुठे हे पहिले सांगा, असा सवाल आंबेडकर यांनी केला.

… तर आमचे ‘अच्छे दिन’ येतील
मोहन भागवत यांच्या काळात ब्राम्हणच जिथे सुरक्षित नाही तिथे इतरांच्या सुरक्षेची हमी कोण घेणार, असा सवाल आंबेडकर यांनी केला. आमदार वारीस पठाण यांनी आंबेडकरांच्या नेतृत्वात सुमारे 70 ते 80 आमदार निवडून आणून सत्ता काबीज करू, असे सांगितले. 2019 मध्ये भाजपाला नाही तर आमचे ‘अच्छे दिन’ येतील, असे पठाण यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या