८ दिवसांची रजा लिहिल्यास एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कापणार नाही !

सामना ऑनलाईन, मुंबई

संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा ३६ दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवू नये म्हणून परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज तातडीची बैठक बोलावून जे कर्मचारी संपकाळातील दिवसांसाठी आठ दिवसांची अर्जित रजा समर्पित करतील त्यांची कोणतीही पगारकपात करू नये, असे निर्देशही रावते यांनी दिले.

परिवहनमंत्री दिवाकर राकते यांनी आज परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांची आज मंत्रालयात बैठक बोलावली. या बैठकीत जे कर्मचारी संपकाळात एक दिवस गैरहजर असतील त्यांना गैरहजेरीसाठी फक्त एक दिवसाचा पगार हा दंड म्हणून कपात  करण्यात येईल किंवा जे कर्मचारी संपकाळातील चार दिवसांसाठी आठ दिवसांची अर्जित रजा समर्पित करतील त्यांची कोणतीही पगारकपात करण्यात येणार नाही. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना त्रास सोसावा लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनांनी यासंदर्भात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याने या दाव्याचा निर्णय लागेपर्यंत ३६ दिवसांचे वेतन कापण्याच्या निर्णयास तात्पुरती स्थगिती देण्यात येत आहे, असे मंत्री रावते यांनी सांगितले.

एस.टी. महामंडळ हे कर्मचाऱ्यांसोबत

सर्कसामान्य एस.टी. कर्मचारी हे नेहमीच प्रवाशांची सेवा करण्यास प्राधान्य देतात. एस.टी. महामंडळ हे अशा एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत आहे. किंबहुना संपकाळातसुद्धा या कर्मचाऱ्यांनी एस.टी.च्या मालमत्तेचे किंका वाहनांचे कुठल्याही प्रकारे नुकसान न करता शांततेत संप केला. लक्ष्मीपूजनाच्या दिकशी संपावर असतानादेखील अनेक कर्मचाऱ्यांनी एस.टी. बसेसचे पूजन केले. या सर्व कर्मचाऱ्यांची एस.टी. कर प्रामाणिक निष्ठा आहे. एस.टी.साठी अहोरात्र मेहनत करणाऱया अशा कर्मचाऱ्यांसोबत आम्ही आहोत, असे रावते यांनी सांगितले.