बोगस मदरशांवर गुन्हे दाखल करणार!

योगेश पाटील । हिंगोली

बोगस मदरशांवर गुन्हे दाखल करावेत आणि अशा मदरशांना अनुदान देणाऱ्या व पाठीशी घालणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी आराफत शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. हिंगोली जिल्ह्यात किती अल्पसंख्यांक विद्याथ्र्यांना किती रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली या प्रश्नाचे उत्तर शेख व उपस्थित अधिकाऱ्यांना देता आले नाही.

राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी आराफत शेख आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अल्पसंख्यांका संबंधीच्या पंधरा कलमी कार्यक्रमाची आढावा बैठक शेख यांच्या अध्यक्षतेखाली 20 मिनीटात आटोपण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगर पालिकांचे मुख्याधिकारी व अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. अल्पसंख्यांकाच्या योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवुन शासकीय योजनांचा लाभ पोहचवावा, अशा सुचना आयोगाच्या अध्यक्षांनी दिल्याचे सुत्रांनी सांगितले.

दरम्यान, या बैठकीनंतर आयोजीत पत्रकार परिषदेत बोलताना हाजी आराफत शेख म्हणाले की, आयोगाचा अध्यक्ष म्हणून 36 जिल्ह्यांचा दौरा करत असुन हिंगोली हा तेरावा जिल्हा आहे. अल्पसंख्यांक म्हणजे केवळ मुस्लीम नाही तर बौध्द, पारसी, खिश्चन, शीख, जैन समाजाचा देखील यामध्ये समावेश होतो. या सर्व समुदायाच्या अडचणी सर्व समाजातील लोकांना भेटून जाणुन घेत आहोत. मौलाना आझाद महामंडळाकडुन 2014 पासुन उद्योग व्यवसायासाठी कर्ज देणे बंद असुन शैक्षणिक कर्ज दिले जात आहे. हिंगोली जिल्ह्यातील किती महाविद्यालयातील किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कम दिली गेली या प्रश्नाचे उत्तर आयोगाच्या अध्यक्षांसह त्यांचे खासगी सचिव व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनाही देता आले नाही

आपली प्रतिक्रिया द्या