महाराष्ट्रात बक्कळ पाऊस पडणार, देशात ९८ टक्के पावसाची शक्यता

53

सामना प्रतिनिधी । पुणे

यंदाच्या मान्सूनमध्ये देशात चांगला पाऊस पडणार असल्याच्या शक्यतेला हवामान खात्याने पुन्हा दुजोरा दिला आहे. पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये देशात सरासरी इतका म्हणजेच ९८ टक्के पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज हवामान खात्याने जाहीर केला आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही महाराष्ट्रात बक्कळ पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पावसाच्या दिर्घकालीन सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सरासरी इतका मानला जातो. यंदाच्या मान्सूनमध्ये ९८ टक्के पावसाचा अंदाज असून, यात ४ टक्के कमी अधिक तफावत होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या दिर्घकालीन अंदाजानुसार देशाच्या वायव्य भागात ९६ टक्के, मध्य भागात १०० टक्के, दक्षिण भागात ९९ टक्के तर ईशान्य भागात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यातही ८ टक्क्यांची कमी अधिक तफावत होण्याची शक्यता आहे.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यातही दमदार पावसाचा अंदाज असून, पाऊस सरासरी गाठण्याचे संकेत आहेत. जुलै मध्ये ९६ टक्के तर ऑगस्टमध्ये ९९ टक्के पाऊस पडणार असल्याचे, यात ९ टक्क्यांची कमी अधिक तफावत राहण्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या