गुगल आणि फेसबुकवर देहविक्रीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप

10

गुगल आणि फेसबुकवर देहविक्रीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप : विविध कारणांनी आधीच गंभीर वादात असलेल्या फेसबुक आणि गुगलवर आता ब्रिटनच्या नॅशनल क्राइम एजन्सीने देहविक्रीला प्रोत्साहन देत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपामुळे सोशल मीडियामध्ये एकच खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांच्या निवडणुकीच्या काळातच रशियाचा अजेंडा आपल्या जाहिरातींमधून आणि कंटेन्टमधून राबवल्याचा फेसबुकवर आरोप करण्यात आला होता. तो वाद कमी होतो न होतो तोवर आता पुन्हा एकदा नव्या आरोपामुळे फेसबुक वादात सापडले आहे. फेसबुक आणि गुगलसारख्या माध्यमांना सर्वात जास्ती पैसा हा त्यांच्याद्वारे दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींमधून मिळत असतो. यापूर्वीदेखील अनेकदा त्यांच्या काही जाहिराती अनैतिक असल्याच्या कारणावरून वादात सापडलेल्या आहेत. आता तर खुद्द नॅशनल क्राइम एजन्सीने ब्रिटनमध्ये जोमाने फोफावणाऱ्या वेश्या व्यवसायाला फेसबुक आणि गुगलच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या जाहिरातींमुळे चालना मिळत असल्याचे उघडपणे सांगितले आहे. ब्रिटनमध्ये ऑनलाइन माध्यमातून मोठ्य़ा प्रमाणात वेश्या व्यवसायाची जाहिरात केली जात असून अशा व्यवसायाला पॉप-अप ब्रॉथेल्स असे म्हटले जाते. असा व्यवसाय चालवणारे अनेक ग्रुप असून ते फेसबुक आणि गुगलच्या माध्यमातून जाहिराती करून आणि वेगवेगळे गट बनवून आपले रॅकेट चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ऍपल मॅकबुकची धमाल : अवाच्या सवा किमतीमुळे कितीही आकर्षक असला तरी ऍपलचा मॅकबुक हा कायम विद्यार्थी आणि सामान्य लोकांच्या ऐपतीबाहेरच राहिलेला आहे. मात्र लॅपटॉपची वाढती बाजारपेठ आणि त्याची लोकप्रियता बघता ऍपल लवकरच १३ इंचांचा स्वस्त आणि मस्त मॅकबुक बाजारात उतरवणार असल्याची बातमी आहे. सध्या बाजारात असलेल्या मॅकबुकमध्ये १२८ जीबीचे स्टोरेज, ८ जीबी रॅम, डय़ुएल कोअर आय-५ प्रोसेसर आहे. याची किंमतदेखील तब्बल ७७,२०० एवढी आहे. आता येणाऱ्या छोट्य़ा मॅकबुकची किंमत उघड झाली नसली तरी त्यातदेखील आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या